हनुमान जयंतीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:42 AM2021-04-24T04:42:19+5:302021-04-24T04:42:19+5:30
या आदेशात म्हटले आहे की, या वर्षी कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती उत्सव मोठ्या संख्येने ...
या आदेशात म्हटले आहे की, या वर्षी कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता दरवर्षीप्रमाणे हनुमान जयंती उत्सव मोठ्या संख्येने एकत्रित येऊन साजरी न करता, हा उत्सव साधेपणाने आपापल्या घरीच साजरा करावा. कोविड-१९चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा-अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. तसेच यावर्षी मंदिरात भजन, कीर्तन, पठण इत्यादींचे किंवा कोणत्याही प्रकारे धार्मिक, सांस्कृतिक अथवा सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. मंदिरामधील व्यवस्थापक अथवा विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाइन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाइटद्वारे उपलब्ध करून द्यावी.
हनुमान जयंती उत्सवानिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६०चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आले आहे.