मालेगाव तालुक्यातील शेतक-यांना तूर पिकावरील कीडसंदर्भात मार्गदर्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 07:05 PM2017-11-03T19:05:47+5:302017-11-03T19:06:50+5:30
मालेगाव - तालुक्यातील वसारी येथे कृषी विभाग मालेगांवमार्फत क्रॉपसॅपअंतर्गत शुक्रवारी शेतकºयांना तूर पिकावरील किडसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव - तालुक्यातील वसारी येथे कृषी विभाग मालेगांवमार्फत क्रॉपसॅपअंतर्गत शुक्रवारी शेतकºयांना तूर पिकावरील किडसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
गत आठवड्यात वसारी येथील एका शेतकºयाला फवारणी करताना विषबाधा झाली होती. या पृष्ठभूमीवर ३ नोव्हेंबर रोजी मार्गदर्शन सभा घेण्यात आली. दिनकर विश्व्नाथ जाधव यांच्या नियोजित प्लाटमध्ये कीड सर्वेक्षक किर्ती मगर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिकांची पाहणी करण्यात आली. कृषी विज्ञान केंद्र करडाचे विशेष तज्ज्ञ आर.एस. डवरे आणि कृषि किड नियंत्रक मिलिंद कांबळे यांनी मार्गदर्शन केले. डवरे म्हणाले की सध्या तूर हे पिक फूल अणि कळी येण्याच्या अवस्थेत आहे. यावर शेंगा पोखरणाºया अळयांचा प्रादुर्भाव झाला आहे. यावर नियंत्रण न केल्यास तुर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात आली. मिलिंद कांबळे यांनी सांगितले की किड नियंत्रत करण्यासाठी प्रती हेक्टरी १० कामगंध सापळे लावावे, मित्र किडीची उपस्थिती लक्षात घ्यावी, पक्षी थांबे लावावे, ५ टक्के लिंबोळी अर्काची फवारणी करावी, मर रोग प्रतिबंधित वानाची लागवड करावी, पिकांची फेरपालट करावी असा सल्ला देण्यात आला. कीर्ति मगर यांनी सांगितले की किडीच्या संख्येनुसार नुकसानाची आर्थिक पातळी वर गेल्यास योग्य त्या किटकनाशकाचे मिश्रण करून फवारणी करावी. फवारणी करताना योग्य ती सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले. यावेळी विष्णु लहाने, विश्वनाथ जाधव, दिलीप अडागळे, संतोष लहाने, लिंबाजी जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.