गुटख्याचे प्रकरण अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 07:55 PM2017-10-29T19:55:07+5:302017-10-29T19:55:53+5:30
कारंजा लाड - कारंजा पोलिसांनी २८ आॅक्टोबरच्या सायंकाळी जप्त केलेले ४५ लाख रुपये किमतीचे गुटखा प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कारंजा लाड - कारंजा पोलिसांनी २८ आॅक्टोबरच्या सायंकाळी जप्त केलेले ४५ लाख रुपये किमतीचे गुटखा प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्द केले आहे. दरम्यान, अलिकडच्या काळात कारंजा शहर परिसरात अवैध मार्गाने गुटख्याची वाहतूक होण्याचे प्रकार वाढीस लागल्याने कारंजा मुख्य वळण केंद्र बनत असल्याची चर्चा आहे.
गोपनिय माहीतीच्या आधारे कारंजा शहरात ४५ लाख रूपयाचा गुटखा तसेच १५ लाख रुपए किंमतीच्या ट्रकसह एकुण ६० लाख रूपयाचा गुटखा २८ आॅक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास एका पेट्रोलपंपानजीक जप्त केल्याची कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले व पोलीस चमूने केली होती. कारंजा शहरात एका पेट्रोल पंपाच्या मागे विमल गुटख्याने भरलेला ट्रक आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील यांना मिळाली होती. त्यांनी त्वरीत उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, कारंजा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एम.एम.बोडखे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पोलीस अधिका-यांनी त्वरीत घटनास्थळ गाठले. यावेळी गुटख्याने उभा असलेला एम.एच.३२ - क्यु ३३२ क्रमांकाचा ट्रक जप्त करून पोलीस स्टेशनना आणण्यात आला. रात्री १० वाजेपर्यंत ट्रकमध्ये असलेल्या गुटख्याच्या विमल पुडया व तबांखु पुडयाचा पंचनामा करण्यात आला. यावेळी ४५ लाख रुपये किंमतीचा गुटखा असल्याचे आढळून आले. सदर गुटखा प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी अन्न व औषधी प्रशासनाकडे रविवारी सुपूर्द करण्यात आले. दरम्यान, अलिकडच्या काळात कारंजा येथे गुटखा जप्त करण्याची काही प्रकरणे उजेडात आली आहे. यावरून कारंजा परिसरातून गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याचे दिसून येते.
-