व्यायामशाळा तपासणीचे अहवाल पालकमंत्र्यांच्या दरबारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 01:42 PM2018-10-12T13:42:16+5:302018-10-12T13:43:13+5:30
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदानाचा लाभ घेतलेल्या व्यायामशाळांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सविस्तर अहवाल पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, क्रीडा विभागाकडे सादर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हा वार्षिक योजनेतून अनुदानाचा लाभ घेतलेल्या व्यायामशाळांची तपासणी पूर्ण झाली असून, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने सविस्तर अहवाल पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, क्रीडा विभागाकडे सादर केला. या अहवालानुसार काय कारवाई होते, याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागात क्रीडा संस्कृती रुजविणे तसेच व्यायाम करण्यासाठी युवकांसह सर्वांनाच व्यायामशाळांची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून व्यायामशाळा बांधकाम, साहित्य खरेदीसाठी अनुदान दिले जाते. प्राप्त प्रस्तावांमधून पात्र ठरलेल्या संस्थांना अनुदान दिल्यानंतर संबंधित संस्थेने व्यायामशाळा सुस्थितीत ठेवणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यातील काही संस्थांनी व्यायामशाळा बांधकामाचे अनुदान घेतल्यानंतर नियमानुसार बांधकाम केले नाही तर काही संस्थांनी व्यायामशाळेचा मूळ उद्देश बाजूला सारत व्यायामशाळांचा वापर अन्य कारणांसाठी केला जात असल्याच्या तक्रारी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी अनुदान वाटप करण्यात आलेल्या व्यायामशाळांची तपासणी करून त्यांच्या सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा, असे निर्देश क्रीडा विभागाला आॅगस्ट महिन्यात दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हा क्रीडा विभागाने व्यायामशाळांची तपासणी केली असून, पालकमंत्र्यांसह जिल्हाधिकारी, क्रीडा विभागाच्या वरिष्ठांकडे अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार वरिष्ठ स्तरावरून नेमकी कोणती कारवाई होते, याकडे क्रीडाप्रेमींसह जिल्हावासियांचे लक्ष लागून आहे.