‘हगणदरीमुक्त निर्धार’ सभेतून पदाधिका-यांना डावलले!
By Admin | Published: June 10, 2017 02:10 AM2017-06-10T02:10:41+5:302017-06-10T02:10:41+5:30
रिसोड पंचायत समिती; पत्रातही उल्लेख टाळला!
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्थानिक पंचायत समितीमध्ये ९ जूनला हगणदरीमुक्ती निर्धार सभा पार पडली. मात्र, या सभेला सभापती, उपसभापतींसह पंचायत समिती सदस्यांना निमंत्रण देण्यात आले नाही. सरपंच, उपसरपंचांना देण्यात आलेल्या पत्रातही पदाधिकार्यांचा उल्लेख टाळल्यामुळे अधिकार्यांच्या या धोरणाप्रती पदाधिकार्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात आला.
यासंदर्भात पंचायत समितीचे उपसभापती महादेव ठाकरे यांनी सांगितले, की तालुक्यात बहुतांश गावांमध्ये शौचालय बांधून आणि प्रस्ताव सादर करूनही अनेक लाभार्थींना अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे. सदर बाब मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांच्या लक्षात आणून दिली असता, त्यांनीही पात्र लाभार्थींंच्या अनुदान मुद्याला फारसे गांभीर्याने घेतलेले नाही. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हगणदरीमुक्ती निर्धार मेळावा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने घेतला असता, तर मोठय़ा प्रमाणात शौचालयांबाबतचे शासनाचे धोरण अधिक व्यापक प्रमाणात गाठल्या गेले असते; परंतु प्रशासनातील अधिकार्यांच्या चुकीच्या धोरणामुळे पदाधिकारी या सभेला उपस्थित राहू शकले नाही, असे ठाकरे यांचे म्हणणे आहे. सभापती छाया पाटील यांनीही या भूमिकेचे सर्मथन करून सभेला जाणे टाळले. यामुळे इतर पंचायत समिती सदस्यांनीही सभेकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.