काेराेनाच्या बचावासाठी बालकांचे घरीच केशकर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:42 AM2021-04-01T04:42:41+5:302021-04-01T04:42:41+5:30
सरत्या वर्षाच्या मार्च महिन्यापासून कडक टाळेबंदीदरम्यान तालुका आणि जिल्ह्यामध्ये प्रशासन आणि शासनाचे निर्बंध असूनही कोरोना या प्राणघातक आजाराची जेवढी ...
सरत्या वर्षाच्या मार्च महिन्यापासून कडक टाळेबंदीदरम्यान तालुका आणि जिल्ह्यामध्ये प्रशासन आणि शासनाचे निर्बंध असूनही कोरोना या प्राणघातक आजाराची जेवढी रुग्णसंख्या होती त्यापेक्षा अधिक रुग्णसंख्या तालुक्यातील अनेक गावांमध्ये मार्चमध्ये आढळून येत आहे. जिल्हा व तालुका प्रशासनाच्या आरोग्यविषयक आवाहन आणि सूचनांचे पालन विविध प्रकारे तालुक्यातील नागरिक करताना आढळत आहेत.
नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र जमू नये, अत्यावश्यक असल्यासच घराबाहेर पडावे, घराबाहेर व घरातही सक्तीने मुखाच्छादनाचा वापर करण्याच्या तथा सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रमांबाबतही अटी व नियम घालून दिलेले असताना रुग्णसंख्येमध्ये झपाट्याने वाढच होत आहे.
घरातील बालकांना या घातक आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी घरगुती पद्धतीने लहान मुलांचे केस परत घरीच कापले जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे. कोरोना या आजारावरील प्रतिबंधक लस सध्या लहान मुलांसाठी उपलब्ध नसल्यामुळे गर्दीपासून मुलांना दूर ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचे या दृश्यांवरून निदर्शनास येत आहे.