देवगडच्या हापूस आंब्याची वाशिममध्ये विक्री!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 10:55 AM2020-04-29T10:55:37+5:302020-04-29T10:55:45+5:30
देवगडच्या हापूस आंब्याच्या ५०० पेट्यांची मंगळवार, २८ एप्रिल रोजी वाशिममध्ये विक्री करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, याची शासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. कोकणातील देवगडच्या हापूस आंब्याच्या ५०० पेट्यांची मंगळवार, २८ एप्रिल रोजी वाशिममध्ये विक्री करण्यात आली. त्यावरून ही बाब पुन्हा अधोरेखीत झाली आहे.
‘लॉकडाऊन’ काळात शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला आणि फळांच्या विक्री प्रक्रियेत कुठलीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी पुढाकार घेऊन शेतकरी ते ग्राहक शेतमालाची थेट विक्री हा उपक्रम राबविला. यामाध्यमातून २३ मार्च ते २८ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यातील २२९ गावांमधील १७२१ शेतकºयांना थेट ग्राहकांशी जोडण्यात आले. त्यातून तब्बल ३ कोटी ३६ लाख ५५ हजार रुपयांची उलाढाल झाली.
याच उपक्रमांतर्गत प्रकल्प संचालक ‘आत्मा’, जि. रत्नागिरी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, ‘आत्मा’ वाशिम यांच्याकडे २८ एप्रिल रोजी राजापूर (जि. रत्नागिरी) येथून ५०० हापूस आंब्याच्या पेट्या पाठविण्यात आल्या. प्रत्येक पेटीमध्ये दोन डझन आंबे होते. त्याची वाशिम शहरातील तिरूपती सिटीमध्ये वास्तव्यास असलेले नगर परिषदेचे कर्मचारी व स्थानिक नागरिकांना एक हजार रुपये पेटीप्रमाणे विक्री करण्यात आली. हापूस आंब्याचे आकर्षण असणाºयांनी अवघ्या अर्ध्या तासातच सर्व आंबा खरेदी करून घेतला. यामाध्यमातून संबंधित आंबा उत्पादकास ५ लाखांची मिळकत झाली. यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्यासह कृषी उपसंचालक निलेश ठोंबरे, तंत्र अधिकारी समाधान पडघन, कृषी सहाय्यक अनिल जयताडे, कृषी सहाय्यक खिल्लारे, पंजाब जाधव, जयप्रकाश लव्हाळे यांनी प्रयत्न केले.
‘लॉकडाऊन’च्या काळात शेतकºयांचे नुकसान होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून सर्वंकष प्रयत्न केले जात आहेत. शेतकरी ते ग्राहक शेतमालाची थेट विक्री या उपक्रमामुळे हा उद्देश बहुतांशी साध्य झाला आहे.
- शंकर तोटावार
जिल्हा अधीक्षक कृषी
अधिकारी, वाशिम