वाशिममध्ये 'हर हर महादेव'चा गजर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 02:43 PM2017-08-14T14:43:20+5:302017-08-14T14:43:49+5:30
वाशिमचे आराध्य दैवत करुणेश्वर व सर्वात जास्त शिवमंदिरे असलेल्या वाशिम नगरीत १४ ऑगस्ट रोजी कावड मंडळाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे सर्वत्र ‘हर हर महादेवाचा’ गजर ऐकायला मिळत होता.
वाशिम, दि. 14 - वाशिमचे आराध्य दैवत करुणेश्वर व सर्वात जास्त शिवमंदिरे असलेल्या वाशिम नगरीत १४ ऑगस्ट रोजी कावड मंडळाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमुळे सर्वत्र ‘हर हर महादेवाचा’ गजर ऐकायला मिळत होता. वाशिम शहरामध्ये तीर्थक्षेत्र काशीनंतर सर्वात जास्त महादेवाची मंदिरं आहेत, असे ‘वत्सगुल्म महात्म्य ’ यामध्ये म्हटले आहे. येथे शिवभाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने दरवर्षी कावड मंडळाच्यावतीने मिरवणूक काढून शिवलिंगास अभिषेक, पूजाअर्चा तसेच शिवाच्या पवित्र तीर्थस्थळावरुन आणलेले तीर्थाचे पूजन केले जाते.
श्रावणमासात शिवजींच्या मंदिरात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. 14 ऑगस्ट रोजी श्रावणमासातील चौथा सोमवार असल्याने यानिमित्त कावड मंडळाच्यावतीने शहरातून मिरवणूक काढण्यात आली. कावड मंडळाची मिरवणूक सकाळपासूनच शहरातून निघून एका ठिकाणी जाण्यास सुरुवात झाली होती.
यावेळी विविध भाविकांच्यावतिने कावड मंडळाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक भाविकांचे स्वागतासाठी कमानी उभारण्यात येऊन त्यांच्या चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास 35 कावड मंडळातील शेकडो भाविकांनी काढलेल्या या मिरवणुकीने संपूर्ण शहर दणाणून गेले होते. शहरातील मन्नासिंह चौक, गाभणे गल्ली, राजनी चौक, नगरपरिषद चौक, दंडे चौक, गणेशपेठ, टिळक चौकासह शहरातील मार्गांवर महिलांनी सडा सारवण करुन रांगोळी घातलेली आढळून आली.