वाशिममध्ये पहिल्यांदाच आढळला ‘हरणटोळ’निमविषारी साप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2018 02:46 PM2018-02-23T14:46:08+5:302018-02-23T14:46:13+5:30
शहरापासून जवळच असलेल्या केकतउमरा या गावातील दीपक पायघन यांच्या शेतातील एका झुडूपावर हरणटोळ प्रजातीचा साप आढळून आला.
वाशिम : शहरापासून जवळच असलेल्या केकतउमरा या गावातील दीपक पायघन यांच्या शेतातील एका झुडूपावर हरणटोळ प्रजातीचा साप आढळून आला. दरम्यान, ‘वॉईल्ड लाईफ रेस्क्यू ग्रुप’च्या सर्पमित्रांनी या सापाला पकडून अनुकूल तथा सुरक्षितस्थळी सोडून दिले.
शेतातील एका छोट्या झुडूपावर साप दिसून येताच दीपक पायघन यांनी सर्पमित्रांना भ्रमणध्वनीवरून त्याची माहिती दिली. दरम्यान, सर्वेश फुलऊंबरकर, आकाश रत्ने, मो. समीर, रवि राठोड यांनी तत्काळ पायघन यांच्या शेताकडे धाव घेऊन निमविषारी हरणटोळ या सापास जीवंत ताब्यात घेतले. शेताला लागूनच एकबुर्जी सिंचन प्रकल्प असल्याने हा साप तेथूनच आला असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला. हरणटोळ हा साप वाशिममध्ये पहिल्यांदाच आढळला असून तो अत्यंत दुर्मिळ असल्याची माहिती सर्पमित्र सर्वेश फुलऊंबरकर यांनी दिली. महेश इंगळे यांनी दिली. पवन पाटील, संदिप गावंडे, पवन पाईकराव आदिंनी याकामी पुढाकार घेतला.