घरकुलाच्या थकीत हप्त्यासाठी अधिकाऱ्यांकडून त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:40 AM2021-01-20T04:40:19+5:302021-01-20T04:40:19+5:30
मानोरा तालुक्यातील हट्टी गावाच्या मीरा तारासिंग राठोड या महिलेने आत्महत्या करण्याचा इशारा दिला असून १८ जानेवारी रोजी गटविकास अधिकारी ...
मानोरा तालुक्यातील हट्टी गावाच्या मीरा तारासिंग राठोड या महिलेने आत्महत्या करण्याचा इशारा दिला असून १८ जानेवारी रोजी गटविकास अधिकारी मानोरा यांच्याकडे निवेदन दिले आहे. या निवेदनात सदर महिलेने नमूद केले आहे की, गावात माझ्या नावाने घरकुल मंजूर झाले असून घरकुलाचे दोन हप्ते मला मिळाले आहेत. तिसरा हप्ता घेण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी देयक दिले आहे. घरकुलाचे बांधकाम झाले असून अधिकारी मात्र पुढील हप्ते देण्यास टाळाटाळ करीत आहेत. यासंदर्भात मी वारंवार गटविकास अधिकारी यांना भेटले असता प्रत्येक वेळेस अधिकारी टाळाटाळ करीत असून प्रत्येक वेळेस पुढील तारीख देत आहेत. त्यामुळे मला मागील तीन महिन्यांपासून शारीरिक व मानसिक त्रास होत आहे. या प्रकाराला कंटाळून २२ जानेवारीपर्यत घरकुलाचा हप्ता न मिळाल्यास २४ जानेवारी रोजी मी शेतात आत्महत्या करणार असून माझ्या आत्महत्येला प्रशासन व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील असेही सदर महिलेने नमूद केले आहे. महिलेने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली असून प्रशासन यासंबंधी काय निर्णय घेते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.