वाशिममध्ये हरभरा गंजीला आग; दोन लाखांचे नुकसान
By संतोष वानखडे | Updated: March 13, 2023 18:24 IST2023-03-13T18:23:13+5:302023-03-13T18:24:32+5:30
शेतातील हरभरा गंजीला आग लागल्याने २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

वाशिममध्ये हरभरा गंजीला आग; दोन लाखांचे नुकसान
वाशिम : मानोरा तालुक्यातील आसोला बु. येथील शेतकरी पुरुषोत्तम शंकर इंगोले यांच्या शेतातील हरभरा गंजीला आग लागल्याने २ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यासंदर्भात इंगोले यांनी १३ मार्च रोजी महसूल प्रशासनाकडे तक्रार नोंदविली.
१२ मार्च रोजी सकाळी इंगोले हे शेतामध्ये हरभरा काढण्याकरीता ट्रॅक्टर व थ्रेशर मशीन घेऊन गेले असता, शेतातील ताडपत्री टाकून झाकलेली गंजी जळून खाक झालेली दिसली. या गंजीमधून अंदाजे ५० पोते हरभरा निघण्याचा अंदाज होता. त्याची अंदाजित किंमत दोन लाख २० हजार रूपये एवढी असून आगीत हरभऱ्याची गंजी पूर्णपणे राख झाली. आग कशी लागली हे मात्र समजले नाही. याबाबत पुरुषोत्तम इंगोले यांनी महसूल विभागाकडे १३ मार्च रोजी तक्रार दिली.