बोरव्हावासीयांचे श्रमदानाचे कार्य कौतुकास्पद - शंभूराजे देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 06:17 PM2020-12-29T18:17:44+5:302020-12-29T18:21:24+5:30
Shambhuraje Desai News : पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी जलसंधारण कामांची माहिती घेतली.
वाशिम : बोरव्हा येथील ग्रामस्थांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत राज्यात चमकदार कामगिरी केली. गावकऱ्यांनी श्रमदानातून केलेले काम कौतुकास्पद आहे. गावाचा विकास साधण्यासाठी ग्रामस्थ करीत असलेल्या प्रयत्नांना शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बोरव्हा (ता. मंगरुळपीर) येथे २८ डिसेंबर रोजी केले.
पालकमंत्री देसाई यांनी बोरव्हा गावाला भेट देऊन गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावर, सरपंच गोपाल लुंगे, पाणी फाउंडेशनचे सुभाष नानवटे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी गावकऱ्यांनी गावाच्या आदर्श पाणलोट प्रतिकृतीच्या सहाय्याने गावाची भौगोलिक स्थिती, श्रमदानातून झालेली कामे आदी विषयी माहिती दिली. तसेच गावामध्ये मोठ्या शेततळ्याची निर्मिती करणे व अडाण नदीतील पाणी सौरपंपाच्या सहाय्याने शेततळ्यामध्ये टाकून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये विद्युत पंपाशिवाय पाणी पोहोचविण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.
पालकमंत्री देसाई म्हणाले, बोरव्हा येथील ग्रामस्थांनी आपल्या गावाच्या विकासाचे स्वप्न पाहिले असून त्यासाठी एकत्र येऊन लोकसहभागातून फार मोठे काम केले आहे. तसेच आणखी काही कामांचे नियोजन करून ती पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांचे हे प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. लोकसहभागातून गावाचा पाण्याचा, सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या या गावकऱ्यांना शासन सवोर्तोपरी मदत करेल, अशी ग्वाही दिली.