नुकसान टाळण्यासाठी हिरव्या उडिद पिकाची तोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 04:33 PM2019-09-15T16:33:29+5:302019-09-15T16:33:56+5:30
उडिदाची हिरवी झाडेच उपटून शेंगा तोडत असल्याचे चित्र मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरात पाहायला मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा (वाशिम) : गेल्या आठ तेदहा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने काढणीवर आलेले उडिदाचे पीक संकटात सापडले आहे. उडिदाच्या शेंगा परिपक्व होऊन सुकल्या असतानाही पावसामुळे झाडे हिरवीच असून, पावसामुळे काढणीच्या कामात खोळंबा निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकरी उडिदाची हिरवी झाडेच उपटून शेंगा तोडत असल्याचे चित्र मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरात पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे शेतकºयांच्या खर्चातही वाढ झाली आहे.
जिल्ह्यात यंदा पाऊस विलंबाने दाखल झाला. त्याचा परिणाम उडिद, मुगाच्या क्षेत्रावर झाला. मुगाचे सरासरी क्षेत्र १४ हजार ७९१ असताना केवळ ६३९० हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली, तर उडिदाचे सरासरी क्षेत्र १४ हजार ९२५ हेक्टर असताना केवळ ८३२८ हेक्टर क्षेत्रावर या पिकाची पेरणी झाली आहे. ही दोन्ही पिके कमी कालावधीची आणि शेतकºयांना आधार देणारी आहेत. आता ही पिके काढणीवर आली आहेत. पिकाच्या शेंगा परिपक्व होऊन सुकल्या आहेत. त्यामुळे त्या शेंगांची तोडणी करणे आवश्यक आहे. तथापि, सततच्या पावसामुळे उडिद, मुगाची झाडे अद्यापही हिरवीच आहेत. त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने शेतात शेंगा तोडणीचे काम करणे कठीण झाले आहे. मालेगाव तालुक्यातील राजुरा परिसरातही गेल्या दहा बारा दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. उडिद पिकाच्या शेंगा सुकल्या असल्या तरी पावसामुळे पिकाचा पाला हिरवाकच्च आहे. आता शेंगा तोडल्या नाही, तर त्या पावसामुळे फुटण्याची, तसेच शेतमालाचा दर्जा खालावण्याची भिती आहे. त्यातच पावसामुळे उडिदाच्या पिकाची सोंगणी अशक्य असल्याने शेतकरी झाडे उपटून रस्त्यावर बसून शेंगा तोडणी करीत आहेत. हा प्रकार मोठा खर्चिक असल्याने उडिद उत्पादक शेतकºयांची मोठी पंचाईत झाली आहे. तथापि, नुकसान टाळण्यासाठी हा प्रकार करण्याशिवाय शेतकºयांकडे पर्यायही उरलेला नाही.
उडिदाचे पिक काढणीला आले पावसामुळे पाला हिरवा तर शेंगा वाळलेल्या आहेत त्यामुळे सोंगणी अशक्य आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये म्हणून मजुरा व्दारा झाडे उपटून रोडवर शेंगा तोडणी करावी लागत आहे मजुरीचा खर्च परवडणारा नाही उडीद पेरुन पश्र्चाताप होत आहे.
-संजय श्रीराम चव्हाण
शेतकरी सुदी (मालेगाव)