म्हणे दारू प्यायल्याने काेराेना हाेत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:37 AM2021-03-15T04:37:03+5:302021-03-15T04:37:03+5:30
जिल्ह्यात दरराेज शेकडाे व्यक्ति काेराेनाबाधित हाेत आहेत. याकरिता प्रशासनाच्या वतीने माेठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असताना, दुसरीकडे दारू पिणाऱ्यांनी ...
जिल्ह्यात दरराेज शेकडाे व्यक्ति काेराेनाबाधित हाेत आहेत. याकरिता प्रशासनाच्या वतीने माेठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत असताना, दुसरीकडे दारू पिणाऱ्यांनी नवीनच अकलेचे तारे ताेडले आहेत. म्हणे, दारू प्यायल्याने काेराेना हाेत नाही. यामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. याबाबत आराेग्य विभागाशी संपर्क साधला असता, हा केवळ गैरसमज असल्याचे आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात काेविड १९ हा श्वसनक्रियेशी संबंधित असलेला आजार आहे, तर मद्यप्राशन केल्यानंतर ते पाेटात जाते. मद्यात असलेले अल्काेहाेल कुठल्याही प्रकारे श्वसनक्रियेत अडथळा निर्माण करणाऱ्या काेराेना विषाणूवर कुठलाच परिणाम करू शकत नाही. उलट मद्यप्राशन केल्याने माणसाची प्रतिकारशक्ती कमी हाेते. अशात काेराेनाचा संसर्ग झाल्यास, सामान्य माणसापेक्षा मद्यपीला अधिक धाेका संभवताे, असे आराेग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
...............
सॅनिटायझर अल्काेहाेलमिश्रितच असल्याचा केला जाताे कांगावा
प्रशासनाच्या वतीने काेराेना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केल्या जात आहे. मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याचे सांगण्यात येत आहे. काेराेनाला प्रभावी ठरणारे सॅनिटायझर अल्काेहलमिश्रित असल्याने, मद्यपींनी दारूमध्येही अल्काेहोल असल्याचे म्हणत, दारू पिणाऱ्या व्यक्तीस काेराेना हाेत नसल्याचे बाेलत आहेत. यामुळे दारूच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. शहरातील व शहराबाहेरील दारू मिळणाऱ्या धाब्यांवर, रेस्टॉरंटवर रात्रीच्या वेळी एकच गर्दी केली जात आहे.
.................
दारू प्यायल्याने काेराेना हाेत नाही हा गैरसमज
दारू प्यायल्याने काेराेना हाेत नाही, हा दारू पिणाऱ्यांचा गैरसमज असून, या गैरसमजात मद्यपींनी राहू नये. काेराेना नियमांचे पालन करून आपले व आपल्या परिवराची खबरदारी घेण्याचे आवाहन आराेग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. सॅनिटायझर अल्काेहाेलिक आहे, म्हणून दारूद्वारे पाेटात जाणारे अल्काेहाेल काेराेनावर प्रभाव टाकणार नाही. हा केवळ गैरसमज आहे, असे आराेग्य विभागाचे म्हणणे आहे.
..........
दारू प्यायल्याने काेराेना हाेत नाही, हा गैरसमज आहे. असे काेणीही म्हटलेले नाही, तसेच दारू ही आराेग्यासाठी घातकच आहे. दारूमधील अल्काेहोल व सॅनिटायझरमधील अल्काेहोल याचा कुठेही संबंध येत नाही. तसे काही असते, तर आराेग्य विभागातर्फे तसे आवाहन केले गेले असते. काेराेना आणि दारूचा दूरपर्यंत कुठेही संबंध येत नाही. त्यामुळे दारू पिणाऱ्यांनी याबाबत गैरसमज पसरवू नये. काेराेनाबाबत काळजी घ्यायची असल्यास, प्रशासनातर्फे केलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- डाॅ.अनिल कावरखे
वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम