‘त्यांनी’ महिनाभरात वाचविला ८२ सापांचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:47 AM2021-08-18T04:47:57+5:302021-08-18T04:47:57+5:30
निसर्ग स्पर्श फाऊंडेशन प्रणित वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम जिल्हाभरात वन्यजीव रक्षण आणि संवर्धनासह सापांच्या संवर्धनाचे कार्य करते. त्यांनी गेल्या ...
निसर्ग स्पर्श फाऊंडेशन प्रणित वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन टीम जिल्हाभरात वन्यजीव रक्षण आणि संवर्धनासह सापांच्या संवर्धनाचे कार्य करते. त्यांनी गेल्या सात वर्षांच्या कालावधीत शेकडो वन्यप्राण्यांचा जीव वाचवितानाच मानवी वस्ती, गुरांचे गोठे, विहिरीत आढळून आलेल्या हजारो सापांना जीवदान देण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही केले आहे. जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक तसेच पर्यावरण अभ्यासक गौरव कुमार इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या सदस्यांनी हे कार्य केले. त्यात गेल्या महिनाभराच्या कालावधीतच या संघटनेच्या मानोरा व मंगरुळपीर तालुक्यातील विविध शाखांनी तब्बल ८२ सापांना पकडत त्यांच्या अधिवासात सोडले. यामध्ये नाग, मण्यार, घोणस या विषारी सापांसह निमविषारी हरणटोळ, तसेच मांजऱ्या, डुरक्या घोणस, धामण, गवत्या, कवड्या, तस्कर, पानदिवड, कुकरी आदी बिनविषारी सापांचा समावेश आहे.
------------------
११ शाखांच्या सदस्यांची कामगिरी
वाईल्ड लाईफ कंझर्वेशन टीम अंतर्गत मानोरा आणि मंगरुळपीर तालुक्यात मिळून ११ शाखा कार्यरत असून, या शाखांतील सदस्यांनीच महिनाभरात ८२ सापांना जीवदान दिले आहे. त्यात मंगरुळपीर -१६, वनोजा -२१, कोलार -१९, गिरोली -१०, अभयखेडा-२, मानोरा -२, कंझरा -६, वापटा -१, बेलोरा - १, पेडगाव -२, तर गोगरी येथील शाखेने एका सापाला जीवदान दिले.
-----------
पकडलेल्या सापांची प्रजातीनिहाय संख्या
प्रजाती - संख्या
नाग - २१
मन्यार - ०५
घोणस - ०२
मांजऱ्या - ०३
हरणटोळ - ०१
धामण - १७
कवड्या - १२
तस्कर - ११
गवत्या - ०४
पाणदिवड - ०४
नानेटी - ०१
डुरक्या घोणस -०१
----------------
कोट: पावसाळ्याच्या दिवसांत बिळात पाणी शिरल्याने सापांचा जमिनीवर संचार वाढतो. यातून मानव-साप संघर्ष वाढीस वाव आहे. अशात आमची संघटना सापांबाबत जनजागृती करून मानव-साप संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करते. याच प्रयत्नांमुळे गेल्या महिनाभरात ८२ सापांचा जीव वाचू शकला.
- गौरव कुमार इंगळे,
मानद वन्यजीवरक्षक, तथा पर्यावरण अभ्यासक, वाशिम