गटशिक्षणाधिकाऱ्यांचे निर्देश डावलून दुपारीच दिली शाळेला सुटी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 06:44 PM2018-06-26T18:44:06+5:302018-06-26T18:45:22+5:30
शेंदुरजना मोरे (ता. मंगरूळपीर) येथील जिल्हा परिषद शाळेला दुपारच्या सुमारास कुलूप असल्याचे आढळून आले. हा प्रकार २६ जून रोजी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी घडला.
- धनंजय कपाले
वाशिम : शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांना उत्साहवर्धक वाटावा, नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उल्हासात व्हावी, यासाठी विद्यार्थ्यांचे स्वागत केले जाते. याशिवाय पहिल्या दिवशी कुठलेही कारण न देता जिल्हाभरातील सर्व शाळा दिवसभर उघड्या ठेवण्याच्या सुचना त्या-त्या तालुक्यातील गटशिक्षणाधिकाºयांनी दिल्या होत्या. असे असताना शेंदुरजना मोरे (ता. मंगरूळपीर) येथील जिल्हा परिषद शाळेला दुपारच्या सुमारास कुलूप असल्याचे आढळून आले. हा प्रकार २६ जून रोजी शाळा प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी घडला.
शाळा सुरू होण्याच्या एक दिवसआधी शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था तसेच स्थानिक सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने शाळेत नव्याने दाखल होणाºया विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देणे, शाळा परिसरात पदयात्रा काढणे, शाळा परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यासाठी पुढाकार घेण्याच्या शिक्षण विभागाच्या सूचना होत्या. शाळा सुरु होण्याच्या दिवशी शाळा सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवणे, शिक्षकांनी वेळेवर उपस्थित राहून प्रभातफेरीचे आयोजन करणे, विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करणे, मोफत पुस्तक वितरण आदी कार्यक्रम आयोजित करणे, अशा पध्दतीने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्याच्याच्याही सूचना २२ जून रोजी मंगरूळपीर पंचायत समितीमध्ये घेण्यात आलेल्या मुख्याध्यापकांच्या बैठकित गटशिक्षणाधिकारी मंजूषा कौशल यांनी दिल्या होत्या.
मात्र, गटशिक्षणाधिकाºयांच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून शेंदुरजना मोरे येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या मर्जीनुसार शाळा दुपारच्या सुमारास बंद केली. दरम्यान, या गंभीर प्रकाराची माहिती गावकºयांनी केंद्रप्रमुख जायभाये, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीकांत माने, गटशिक्षणाधिकारी मंजूषा कौशल यांना दिली. त्यानंतर कौशल यांनी शाळा खरोखरच बंद आहे का, याची चाचपणी केली असता शाळा बंद असल्याचे निष्पन्न झाले. घडलेल्या या एकूणच प्रकारामुळे पालकांमधून संतप्त सूर उमटत आहे.
शेंदुरजना मोरे येथील मुख्याध्यापकांनी दुपारी २ वाजेपर्यंतच शाळा घेतली. त्यानंतर ते शाळा बंद करून घरी गेले. हा प्रकार गंभीर असून सर्व मुख्याध्यापकांना शाळेच्या वेळेमध्ये कुठलाही बदल करायचा नाही, अशा स्पष्ट सुचना दिल्या होत्या. याउपरही संबंधित मुख्याध्यापकांनी शाळेच्या वेळेत बदल करण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळविले नाही. यासंबंधी शेंदुरजना मोरे येथील शाळेचा अहवाल मागितला आहे. तो प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- मंजूषा कौशल, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, मंगरूळपीर