जिल्हा परिषदेत मुख्याध्यापकांची शाळा; सीईओ झाले गुरूजी!
By सुनील काकडे | Published: February 16, 2024 07:38 PM2024-02-16T19:38:43+5:302024-02-16T19:38:50+5:30
विद्यार्थी हित केंद्रबिंदू : शैक्षणिक दर्जा सुधारण्याचे उद्दिष्ट.
वाशिम : अधिकांश गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावला आहे. ९वी, १०वीच्या बहुतांश विद्यार्थ्यांना साधे वाचता, लिहिता देखील येत नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून हे चित्र पालटण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांनी आता सतर्क व्हावे; अन्यथा संबंधितांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिला.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७७५ पेक्षा अधिक शाळा आहेत. त्यावर कार्यरत मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांची एकत्रित बैठक घेण्यासाठी एकही मोठे सभागृह वाशिमात उपलब्ध नाही. त्यामुळे आजपर्यंत संबंधितांची बैठकच झाली नव्हती. मात्र, विद्यमान सीईओ वाघमारे यांनी सभागृहाच्या भानगडीत न पडता थेट जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच ७७५ मुख्याध्यापक, ७१ केंद्रप्रमुख, ६ गटशिक्षणाधिकारी आणि १४ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना बसवून मॅरेथाॅन बैठक घेतली.
वाघमारे यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासंबंधी पाच महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, नव्या शैक्षणिक सत्रापासून दोन महिन्यांतून एकदा मुलांची मुलभूत चाचणी घेतली जाईल. त्यातून त्यांना इंग्रजी आणि मराठी वाचता येते का? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार येतो का? हे तपासले जाईल. याशिवाय प्रत्येक शाळेत २०० बहुपयोगी झाडांची लागवड करायची आहे. महिन्यातून एकवेळ क्षमता चाचणी घेवून वर्गातील मुलांना त्या-त्या विषयात पारंगत होण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, यावर भर द्यायचा आहे. स्वत: शिक्षक व मुख्याध्यापकांनीच हे काम इमानेइतबारे करून मुलांचा शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वाघमारे यांनी केले.
आकडेवारीतील फरक खपवून घेतला जाणार नाही
शिक्षक व मुख्याध्यापकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मुलभूत चाचणी, क्षमता चाचणी घेवून तसा अहवाल पालक अधिकाऱ्यांकडे सोपवावा. शाळांना मी अचानक भेटी देवून तपासणी करेल. त्यावेळी आकडेवारीत गोंधळ किंवा फरक आढळून आल्यास ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असे सीईओ वैभव वाघमारे म्हणाले.
वेळेची शिस्त पाळणे महत्वाचे
जि.प.च्या प्रांगणावर आयोजित बैठक सकाळी १०.३० वाजता होणार होती; मात्र प्रशासकीय यंत्रणेकडून काढण्यात आलेल्या पत्रावर ती वेळ ९ वाजताची देण्यात आली. त्यानुसार, सीईओ वाघमारे हे ९.४५ ऐवजी ९.१३ वाजता हजर झाले. मात्र, काही मुख्याध्यापक ९.४५ नंतर आले. तथापि, वेळेची शिस्त पाळणे महत्वाचे आहे. त्याच कुचराई करू नका, असा सल्ला सीईओंनी उपस्थितांना दिला.