‘हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर’ला मिळणार १६२ डॉक्टर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:30 PM2018-10-06T17:30:08+5:302018-10-06T17:30:50+5:30
वशिम : जिल्ह्यातील पाचठिकाणी ‘हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर’ (आरोग्यवर्धिनी केंद्र) उभारण्यात आले असून त्यात आवश्यक १६२ बीएएमएस डॉक्टर नेमण्याची प्रक्रिया सद्या वेगात सुरू आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वशिम : जिल्ह्यातील पाचठिकाणी ‘हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटर’ (आरोग्यवर्धिनी केंद्र) उभारण्यात आले असून त्यात आवश्यक १६२ बीएएमएस डॉक्टर नेमण्याची प्रक्रिया सद्या वेगात सुरू आहे. त्यानुषंगाने प्राप्त झालेल्या ४०० पेक्षा अधिक अर्जधारकांच्या कागदपत्रांची पडताळणी गेल्या दोन दिवसांत पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आकांक्षित जिल्हे अभियानांतर्गत ग्रामीण भागात दर्जेदार आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील शेलुबाजार, किन्हीराजा, आसेगाव, शेंदुरजना आणि केनवड अशा पाचठिकाणी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. त्याचे उद्घाटन २२ सप्टेंबर रोजी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते करण्यात आले. दरम्यान, या आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये १६२ बीएएमएस डॉक्टरांची आवश्यकता असून त्यादृष्टीने प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरू आहेत. संबंधित पात्र उमेदवारांकडून यासाठी २४ जुलैपर्यंतच अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार, जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून १६२ जागांकरिता साधारणत: ४०० अर्ज पात्र ठरले. संबंधितांच्या कागदपत्रांची पडताळणी आता सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतीमत: १६२ डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
१२ प्रकारच्या सुविधा; ६७ प्रकारची औषधी!
वाशिम जिल्ह्यातील आरोग्य सेवा अधिक दर्जेदार करण्याच्या हेतूने पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘हेल्थ अँड वेलनेस सेंटर’ सुरू झाले असून त्याठिकाणी १२ प्रकारच्या सुविधा तसेच ६७ प्रकारची औषधी पुरविली जाणार आहे. याशिवाय वैद्यकीय उपचाराच्या दृष्टिने महत्वाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.