डेंग्यूवर नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सरसावला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 02:56 PM2019-11-11T14:56:29+5:302019-11-11T14:56:46+5:30
२ नोव्हेंबर रोजी कनिष्का सुभाष रोकडे (वय ३ वर्षे) या चिमुकलीचा डेंग्यूची लागण झाल्याने मृत्यू झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
धनज बु : येथुन जवळच असलेल्या राहटी येथे चालू महिन्यात डेंग्यूचे सहा रुग्ण आढळले. त्यातील एका तीन वर्षाच्या चिमुकलीचा २ नोव्हेंबरला मृत्यू झाला. यामुळे मोठी खळबळ माजली असून डेंग्यूवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून युद्धस्तरावर उपाययोजना केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की चालू महिन्यात २ नोव्हेंबर रोजी कनिष्का सुभाष रोकडे (वय ३ वर्षे) या चिमुकलीचा डेंग्यूची लागण झाल्याने मृत्यू झाला. यासोबतच अन्य पाच जणांनाही डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यातील तीन रुग्णांची प्रकृती चांगली असून ते सद्या राहटी येथे आहेत; परंतु वैष्णवी संजय अवघड (वय २२ वर्षे), मालती मनोहर ठाकरे (वय ६० वर्षे) या दोन रुग्णांवर नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकारामुळे राहटी या गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर म्हसके यांच्या मार्गदर्शनाखाली ३ नोव्हेंबरपासून गावात कंटेनर सर्वेक्षण, टेमीफॉस राऊंड, जलदताप सर्वेक्षण, रक्त नमुने गोळा करणे, पडीक विहिरीमध्ये गप्पीमासे सोडणे, डास प्रतिबंधक धुर फवारणी आदी उपाययोजना युद्धस्तरावर राबविण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
राहटी येथे डेंंग्युची लागण झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तत्काळ धनज बु. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने सर्व आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्या असून सद्य:स्थितीत रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची प्रकृती चांगली आहे.
- डॉ. सागर मस्के
वैद्यकीय अधिकारी, धनज बु.
डेंग्युचे रुग्ण आढळल्यानंतर राहटी गावात पाणी नमुने तपासणी, डास प्रतिबंधक धुर फवारणी, सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची स्वच्छता आदी उपाययोजना करण्यात आल्या. यासह घरोघरी जावून संशयित रुग्णांची तपासणी देखील सुरू आहे.
- डॉ. किरण जाधव
तालुका वैद्यकीय
अधिकारी, मानोरा