कोरोना विषाणुबाबत आरोग्य विभाग सज्ज - डॉ. अंबादास सोनटक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:42 PM2020-04-04T17:42:47+5:302020-04-04T17:43:00+5:30
वाशिम जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के यांच्याशी साधलेला हा संवाद...
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर प्रत्येक जण सावधगिरी म्हणून दक्षता घेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर कोणकोणत्या उपाय योजना आरोग्य विभागाच्यावतिने राबविण्यात येत आहेत यासंदर्भात वाशिम जिल्हा शल्य चिकित्सक अंबादास सोनटक्के यांच्याशी साधलेला हा संवाद...
जिल्हयातील एकूण आरोग्य सुविधा कशी आहे?
जिल्हयात लेडी हार्डिंग, जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयामार्फत रुग्णांवर तपासणी केल्या जातआहे. वाशिम येथील स्त्री रुग्णालयात क्वारंटाईनची (१४ दिवस) व्यवस्था करण्यात आली , जिल्हा सामान्य रुग्णालयात दक्षतेसाठी विलगिकरण कक्ष स्थापन करण्यात आले आहे.
जिल्हयात कीती व्हेंटिलटर्स आहेत?
जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात २ आणि खासगी रुग्णालयातील ११ मिळून १७ ‘व्हेंटिलेटर्स’ उपलब्ध आहेत. रुग्णांवर योग्य उपचार केल्या जात आहेत.
कोरोनासंदर्भात कोणती दक्षता घ्यावी?
मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्यानंतर विशिष्ट अंतर राखून उभे राहणे, घराबाहेर न पडणे आदी दक्षता घेणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणू संसर्गासंदर्भात काय सांगाल?
कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेणे हा एकमेव उपाय आहे. सरकारने ज्या काही उपाययोजना सांगितले, निर्णय घेतले त्याची तंतोतंत अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे अन्यथा संपूर्ण मानवजातीला संसर्ग होण्यास फारसा वेळ लागणार नाही. इटली, अमेरिका यासारख्या प्रगत देशांनी कोरोना विषाणूसमोर हात टेकले आहेत. त्यामुळे आपण कोरोना विषाणू संसर्गाला गांभीर्याने घेऊन ‘लॉक डाऊन’च्या काळात घरातच राहणे आवश्यक आहे.
खासगी डॉक्टरांचे सहकार्य लाभत आहे का?
२६ मार्चपर्यंत खासगी डॉक्टराना आरोग्य सेवा सरंक्षक कीट उपलब्ध नसल्याच्या कारणाने सेवा बंद केली होती. जिल्हाधिकारी यांनी डॉक्टर संघटनेशी चर्चा करुन त्यावर तोडगा काढल्यानंतर खासगी डॉक्टरांनी सेवा देण्याचे कार्य सुरु केले आहे. तसेच आरोग्य सेवेसाठी त्यांचे कधीही काम पडल्यास खासगी डॉक्टरमंडळी सेवा देण्यास तयार आहेत. दोन खासगी रुग्णालय अधिग्रहीत केल्या जाणार आहेत.
कोरोना विषाणुच्या अनुषंगाने सर्वांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम आहेच तर मास्क लावणे, वारंवार हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गेल्यानंतर विशिष्ट अंतर राखून उभे रहावे व कोणत्याही अफवांना बळी पडू नये. आरोग्य विभाग सर्वाची काळजी घेत आहे. नागरिकांनी सहकार्य करावे.