‘डेल्टा प्लस'बाबत आरोग्य विभाग दक्ष; १०० नमुने तपासणीसाठी दिल्लीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 09:46 AM2021-06-30T09:46:30+5:302021-06-30T09:46:39+5:30

Corona Cases in Washim : खबरदारी म्हणून सर्वच मुख्य कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक सुविधांची पूर्तता केली जात आहे.

Health department vigilant about ‘Delta Plus’; 100 samples to Delhi for testing | ‘डेल्टा प्लस'बाबत आरोग्य विभाग दक्ष; १०० नमुने तपासणीसाठी दिल्लीला

‘डेल्टा प्लस'बाबत आरोग्य विभाग दक्ष; १०० नमुने तपासणीसाठी दिल्लीला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात असले तरी कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’बाबत आरोग्य विभाग दक्ष असून, जिल्ह्यातील १०० कोरोनाबाधितांचे नमुने तपासणीसाठी दिल्लीला पाठविण्यात आले आहेत. शिवाय खबरदारी म्हणून सर्वच मुख्य कोविड केअर सेंटरमध्ये आवश्यक सुविधांची पूर्तता केली जात आहे.
कोरोनाची दुसरी लाट कमी होत असतानाच कोरोनाचा नवीन विषाणू महाराष्ट्रात सापडला आहे. शास्त्रज्ञांनी त्याला ‘डेल्टा प्लस’ (ए.वाय.-१ व्हेरियंट) नाव दिले आहे. येत्या ६ ते ८ आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, राज्यात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनेही राज्याला अलर्ट केले आहे. वाशिम जिल्ह्यातही यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. 
राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने ग्रस्त रुग्णांनी कुठे प्रवास केला, त्यांचे लसीकरण झाले का, कोरोनाची पुन्हा लागण झाली का, ही माहिती राज्य शासनाकडून गोळा केली जात आहे. 
त्यामुळेच जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात आला असून, यातील १०० नमुने तपासणीसाठी दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.  अद्याप त्यांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला नाही.
 


कोरोनाबाधितांच्याच नमुन्यांची चाचणी
कोरोना संसर्गाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटवर नियंत्रणासाठी शासनाकडून व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात आरोग्य विभागाला विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, दर महिन्याला शंभर नमुने दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना आहेत. चाचणीत जे व्यक्ती कोरोनाबाधित येतात त्यापैकी निवडक नमुन्यांची चाचणी करण्यासाठी दिल्लीला पाठविले जातात.


अहवालास लागतो महिनाभराचा वेळ
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण एखाद्याला झाली असेल तर त्याचे नमुने तपासणीसाठी दिल्ली येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेत पाठवावा लागतात. जिल्हास्तरावर कोरोना चाचणीसाठी संकलित केलेल्या नमुन्यांची तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही बाधित व्यक्तींचे नमुने डेल्टा प्लसच्या संसर्गाची खातरजमा करण्याच्या उद्देशाने दिल्लीला पाठविण्यात आले आहेत.

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे प्रमाण राज्यात नगण्य आहे. त्यातच शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तातडीच्या स्वतंत्र उपाययोजना अद्याप नाहीत. खबरदारी म्हणून दर महिन्याला १०० कोरोनाबाधितांचे नमुने तपासणीसाठी दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. गत आठवड्यात हे नमुने पाठविले असून, त्यांचे अहवाल प्राप्त झाले नाहीत.
-डॉ. मधुकर राठोड , जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम

Web Title: Health department vigilant about ‘Delta Plus’; 100 samples to Delhi for testing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.