‘डेल्टा प्लस'बाबत आरोग्य विभाग दक्ष; १०० नमुने तपासणीसाठी दिल्लीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:26 AM2021-06-30T04:26:23+5:302021-06-30T04:26:23+5:30
कोरोनाची दुसरी लाट आता कमी होत असताना कोरोनाचा नवीन अवतार महाराष्ट्रात पोहचला आहे. शास्त्रज्ञांनी त्याला ‘डेल्टा प्लस’ (ए.वाय.-१ व्हेरियंट) ...
कोरोनाची दुसरी लाट आता कमी होत असताना कोरोनाचा नवीन अवतार महाराष्ट्रात पोहचला आहे. शास्त्रज्ञांनी त्याला ‘डेल्टा प्लस’ (ए.वाय.-१ व्हेरियंट) हे नाव दिले आहे. येत्या ६ ते ८ आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, राज्यात डेल्टा प्लसचे २१ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनेही राज्याला अलर्ट केले आहे. वाशिम जिल्ह्यातही आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार यावर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने तयारी केली आहे. राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने ग्रस्त रुग्णांनी कुठे प्रवास केला, त्यांचे लसीकरण झाले का, कोरोनाची पुन्हा लागण झाली का, ही माहिती राज्य शासनाकडून गोळा केली जात आहे. त्यामुळेच जिल्ह्यात लसीकरणाला वेग देण्यात आला असून, यातील १०० नमुने तपासणीसाठी दिल्लीच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अद्याप त्यांचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला नाही.
-----------------
कोरोना बाधितांच्याच नमुन्यांची चाचणी
कोरोना संसर्गाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटवर नियंत्रणासाठी शासनाकडून व्यापक उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात आरोग्य विभागाला विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले असून, दर महिन्याला शंभर नमुने दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याच्याही सूचना आहेत. चाचणीत जे व्यक्ती कोरोनाबाधित येतात त्यापैकीच निवडक नमुन्यांची चाचणी करण्यासाठी दिल्लीला पाठविले जातात.
-----------------
अहवालास लागतो महिनाभराचा वेळ
कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण एखाद्याला झाल असेल, त्याची तपासणी करण्यासाठी नमुना दिल्ली येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेतच पाठवावा लागतो. जिल्हास्तरावर कोरोना चाचणीसाठी संकलित केलेल्या नमुन्यांची तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर काही बाधित व्यक्तींचे नमुने डेल्टा प्लसच्या संसर्गाची खातरजमा करण्याच्या उद्देशाने दिल्लीला पाठविले जातात.
----------------------
कोट : डेल्टा प्लस व्हेरिएंटचे प्रमाण राज्यात नगण्य आहे. त्यातच शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तातडीच्या स्वतंत्र उपाययोजना अद्याप नाहीत. तथापि, खबरदारी म्हणून दर महिन्याला १०० कोरोनाबाधितांचे नमुने तपासणीसाठी दिल्ली येथील प्रयोगशाळेत पाठविले जात आहेत. गत आठवड्यात हे नमुने पाठविले असून, त्यांचे अहवाल प्राप्त झाले नाहीत.
-डॉ. मधुकर राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक, वाशिम
--------------
बॉक्स: कोरोना बाधितांची सद्यस्थिती
-एकूण बाधित -४१,३९७
- अॅक्टिव्ह -२०९
डिस्चार्ज-४०,५६८
-मृत्यू -६१९