डासांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या उपाय योजना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 07:37 PM2017-11-13T19:37:40+5:302017-11-13T19:41:23+5:30
शिरपूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांनी तातडीने डासांच्या प्रादूर्भावावर नियंत्रणासाठी उपाय योजना केल्या आहेत. या अंतर्गत गावात २२ कर्मचा-यांमार्फ त घरोघरी जाऊन वापराच्या पाण्यात डासांच्या अळ्या नष्ट करणारे केमिफास्ट द्रावण टाकल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम): गावात डासांचा प्रादूर्भाव वाढला असतानाही आरोग्य विभागाकडून उपाय योजना करण्यात येत नसल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. या पृष्ठभूमीवर लोकमतने १२ नोव्हेंबरच्या अंकात ‘फॉगिंग मशीन’अभावी आरोग्य धोक्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून लक्ष वेधले. त्याची दखल घेत शिरपूर आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांनी तातडीने डासांच्या प्रादूर्भावावर नियंत्रणासाठी उपाय योजना केल्या आहेत. या अंतर्गत गावात २२ कर्मचा-यांमार्फ त घरोघरी जाऊन वापराच्या पाण्यात डासांच्या अळ्या नष्ट करणारे केमिफास्ट द्रावण टाकल्या जात आहे.
शिरपूर जैन येथे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे हिवतांप, मलेरियासारख्या आजारांनी तोंड वर काढले असून, डासांवर नियंत्रणासाठी आरोग्य विभागाकडून धूर फवारणी होत नसल्याने ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. प्रत्यक्षात आरोग्य विभागाकडे धूर फवारणीसाठी ‘फॉगिंग मशीन’च नसल्याने पंचाईत झाली होती. एकिकडे ग्राम पंचायत मार्फत गावात स्वच्छतेसाठी घंटागाडीचा वापर केला जात असला तरी डासांचा प्रादूर्भाव व त्यापासून होणा-या आजारांना रोखण्यासाठी गावात धूर फवारणी करणे गरजेचे होते. तथापि, या संदर्भात पर्यायी उपाय योजना करण्यात येत नव्हत्या. अशात प्राथमिक आारोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिका-यांनी जिल्हास्तरावरून ‘फॉगिंग मशीन’ उपलब्ध करुन गावात धूर फवारणी करावी व डासांच्या प्रादूर्भावापासून होणा-या आजाराला आळा घालावा अशी मागणी गावक-यांकडून केली जात होता. या पृष्ठभूमीवर ग्रामस्थांच्या आरोग्याला असलेला धोका लक्षात घेऊन लोकमतने १२ नोव्हेंबरच्या अंकात ‘फॉगिंग मशीन’अभावी आरोग्य धोक्यात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून आरोग्य विभागाचे लक्ष वेधले. त्याची दखल वैद्यकीय अधिका-यांनी घेतली आणि ‘फॉगिंग मशीन’ उपलब्ध होत नसली तरी, डासांची उत्पत्ती करणा-या अळ्या नष्ट करण्यासाठी केमिफास्ट नावाचे द्रावण घरोघरी वापराच्या पाण्यात टाकण्याचे निर्देश सहकारी कर्मचाºयांना दिले. त्यांनी २२ कर्मचाºयांकडे ही जबाबदारी सोपविली. त्यानुसार आरोग्य सहाय्यक वाय. के. शिंदे, आरोग्य सेवक मुन्ना लांडगे, अमर झळदे, रवी जाधव, रवी मुळे, गोपाल तायडे, भिमराव शिंदे, नामदेव पुंड आणि आशा सेविकांचा समावेश आहे. दरम्यान, डासांवर प्रभावी नियंत्रणासाठी आठवड्यातील एक दिवस कोरडा पाळण्यासह सांडपाणी साचू न देता त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकाºयांनी ग्रामस्थांना केले आहे.