हॉटस्पॉट ठिकाणी आरोग्य विभागाचा ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:40 AM2021-04-18T04:40:22+5:302021-04-18T04:40:22+5:30
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. शहरासोबतच ग्रामीण भागात हॉटस्पॉट गावांची संख्याही ...
वाशिम : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढला आहे. शहरासोबतच ग्रामीण भागात हॉटस्पॉट गावांची संख्याही वाढली आहे. या हॉटस्पॉट ठिकाण असलेल्या गावांत, तसेच परिसरात कोरोना संक्रमितांवर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच आशासेविका, ग्रामस्तरीय समित्या आदी ‘वॉच’ ठेवत आहेत.
गत काही दिवसांपासून शहरासोबतच ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. गोवर्धना, धमधमी, चिखली यासह अनेक गावांत कोरोना संक्रमित रुग्ण आढळून येत आहे. वाढत्या कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहेत. यासोबत अन्य विभागाचेही सहकार्य लाभत आहे. ग्रामीण भागात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामस्तरीय समित्या गठीत केल्या आहेत. त्यांचे सहकार्यही घेतले जात आहे. हॉटस्पॉट असलेल्या परिसरात, गावांत कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी शासन व जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचे पालन होते किंवा नाही, याची माहिती घेण्यात येत आहे. याशिवाय दैनंदिन माहिती संकलनावर भर दिला जात आहे. विशेषत: गोवर्धन गावावर विशेष वॉच ठेवण्यात येत आहे. या गावात बाहेरगावावरून येणाऱ्यास प्रतिबंध केला असून, गोवर्धन गावातून बाहेर जाण्यासही मनाई केली आहे.
०००
बॉक्स
ग्रामस्तरीय समित्यांनी सक्रिय राहावे
ग्रामीण भागातही कोरोना विषाणू संसर्ग चांगलेच हातपाय पसरत असल्याने, गावकऱ्यांसह स्थानिक प्रशासन, आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. ग्रामस्तरीय समितीच्या माध्यमातून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले आहेत. काही ठिकाणी ग्रामस्तरीय समितीमधील पदाधिकारी, तसेच सदस्य हे सक्रिय आहेत, तर काही ठिकाणी अजून सक्रिय होणे बाकी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच ग्रामस्तरीय समित्यांनी अधिक सक्रिय होऊन कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन प्रशासनाने केले.
०००
बॉक्स
गृहविलगीकरणातील रुग्णांवर लक्ष
कोरोना संक्रमित आढळून आलेल्या रुग्णांपैकी काही रुग्ण गृहविलगीकरणातील आहेत. गृहविलगीकरणात असलेले रुग्ण घरातच आहेत की, घराबाहेर फिरत नाहीत. याकडे स्थानिक आशासेविका, आरोग्य कर्मचारी लक्ष देत आहेत. विविध उपाययोजनांच्या माध्यमातून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.