आरोग्य सभापतींनी घेतला लसीकरणाबाबत आढावा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:29 AM2021-06-03T04:29:00+5:302021-06-03T04:29:00+5:30
वाशिम : ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाचा टक्का वाढविण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी २ जून ...
वाशिम : ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाचा टक्का वाढविण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती चक्रधर गोटे यांनी २ जून रोजी आरोग्य विभागाकडून लसीकरणाबाबतचा आढावा घेतला. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय असून, नागरिकांनी कोणताही गैरसमज, भीती न बाळगता लस घ्यावी, असे आवाहन गोटे यांनी केले.
दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण अधिक संख्येने आढळून आले. अलीकडच्या काळात शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात कोरोना रुग्ण जास्त संख्येने आढळून येत असल्याने लसीकरणावर भर देण्यात येत असल्याचे चक्रधर गोटे यांनी सांगितले. यावेळी उपलब्ध लसीचा साठा, लसीकरण शिबिर, लसीकरण केंद्रावरील सुविधा आदींचा आढावा गोटे यांनी आरोग्य विभागाकडून घेतला. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी पर्याय आहे. लसीकरण झालेल्या नागरिकाला कोरोना संसर्ग जरी झाला तरी गंभीर लक्षणे आढळून आलेली नाहीत किंवा मृत्यूचा धोका संभवत नाही. त्यामुळे पात्र नागरिकांनी कोणत्याही गैरसमजुतीवर विश्वास न ठेवता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी. पहिल्यांदा लस घेणाऱ्या पात्र व्यक्तीने मला कोविशिल्ड किंवा कोवॅक्सिन यापैकी कोणत्या एका लसीचा आग्रह धरू नये, या दोन्ही लसी कोरोना प्रतिबंधक आहे. ज्यांनी पहिला डोस ज्या लसीचा घेतला आहे, त्यांनी त्याच लसीचा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन गोटे यांनी केले.