मांडवा येथे आरोग्य उपकेंद्र बंदच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:23+5:302021-05-06T04:43:23+5:30
रिसोड : रिसोड तालुक्यातील ग्राम मांडवा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत असूनही उपकेंद्र अद्याप सुरू झाले नाही. कुलूपबंद ...
रिसोड : रिसोड तालुक्यातील ग्राम मांडवा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची सुसज्ज इमारत असूनही उपकेंद्र अद्याप सुरू झाले नाही. कुलूपबंद असलेले उपकेंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी प्रभारी सरपंच भाऊराव चव्हाण यांनी सोमवारी निवेदनाद्वारे केली आहे.
मांडवा येथे आरोग्य उपकेंद्राची इमारत तयार आहे. परंतु, आरोग्य उपकेंद्र अद्याप सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे मांडवा परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. लाखो रुपये खर्च करून आरोग्य विभागाची भव्य व सुसज्ज इमारत रुग्णांच्या सेवेसाठी उभी केली. अद्याप या इमारतीचे लोकार्पण झाले नाही. कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य, गोरगरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळाव्या याकरिता आरोग्य सेवेवर भर देण्यात येत आहे; तर दुसरीकडे काही किरकोळ कारणांमुळे नवीन उपकेंद्र सुरू होत नसल्याचे दिसून येते. मांडवा येथील उपकेंद्र सुरू करण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली. मात्र, अद्याप उपकेंद्र सुरू होऊ शकले नाही. याबाबत प्रभारी सरपंच भाऊराव चव्हाण यांनी आक्रमक पवित्रा घेत उपकेंद्र तातडीने सुरू करावे अन्यथा ग्रामस्थांसह आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. यासंदर्भात मोप प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सिंग म्हणाले की, आरोग्य उपकेंद्र मांडवा येथील इमारतीचे बांधकाम व्यवस्थित नाही तसेच तेथे अतिक्रमण झालेले आहे. या प्रकारामुळे या इमारतीमध्ये आरोग्य विभागाचे काम करणे सुरू झाले नाही, असे डॉ. सिंग यांनी स्पष्ट केले.