घनकचरा व्यवस्थापनाची कामे सुरु न करणाऱ्या गावांची सुनावणी
By संतोष वानखडे | Published: September 18, 2023 03:49 PM2023-09-18T15:49:15+5:302023-09-18T15:49:57+5:30
वाशिम जिल्ह्यातील सर्व गावे कचरामुक्त करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे निर्देश जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले.
वाशिम : जिल्ह्यात सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची ज्या गावातील कामे अजुनही सुरु झाले नाहीत, त्या गावांची सुनावणी गट विकास अधिकारी यांनी घ्यावी आणि त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सोमवारी यंत्रणेला दिले.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात १८ सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत आणि जल जिवन मिशन अंतर्गत सभा घेऊन त्यांनी घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामाच्या सद्यस्थितीचा गावनिहाय आढावा घेतला. 'कचरामुक्त भारत' ही स्वच्छता हीच सेवा या मोहिमेची यावर्षीची टॅग लाईन आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्व गावे कचरामुक्त करण्यासाठी जोमाने कामाला लागा असे निर्देश जिल्हा परिषदचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले. यावेळी स्वछता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे, महाराष्ट्र जिवन प्राधिकरनचे कार्यकारी अभियंता निलेश राठोड, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजिंक्य वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वच्छता ही सेवा पंधरवडा प्रभावी राबविण्याच्या सुचनाही ठाकरे यांनी दिल्या. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे अजुनही सुरु न करणाऱ्या गावांची सुनावणी गट विकास अधिकारी यांनी घ्यावी आणि त्याबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देशही अध्यक्ष ठाकरे यांनी दिले.