प्रलंबित २२६९ प्रकरणांवर होणार सुनावणी; शनिवारी राष्ट्रीय लोक न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 05:52 PM2018-07-10T17:52:00+5:302018-07-10T17:53:02+5:30
वाशिम : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या सूचनेनुसार शनिवार, १४ जुलै २०१८ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा यांच्या सूचनेनुसार शनिवार, १४ जुलै २०१८ रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत राष्ट्रीय लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दाखलपुर्व व न्यायालयातील प्रलंबित अशा एकूण २२६९ प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव यांनी केले आहे.
दाखलपुर्व प्रकरणांमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, कामगारांचे वाद विद्युत आणि पाणी देयक बद्दलची प्रकरणे (आपसात तडजोड करण्याजोगी प्रकरणे वगळून), आपसात करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, वैवाहिक आणि इतर दिवाणी वाद आदीविषयक प्रकरणांचा समावेश आहे. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांमध्ये आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, वैवाहिक वाद, कामगारांचे वाद, भू-संपादन प्रकरणे, विद्युत आणि पाणी देयकबद्दलची प्रकरणे, सेवा विषयक पगार, भत्ते व सेवा निवृत्तीचे फायदेविषयक प्रकरणे, महसुली प्रकरणे, भाडे, वहिवाटीचे हक्क, मनाई हुकुमाचे दावे, विशिष्ट पूर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे.
राष्ट्रीय लोक न्यायालयामुळे वेळ आणि पैशाची बचत
लोक न्यायालयाच्या निवाड्याविरूद्ध अपील नसल्याने एकाच निर्णयात कोर्टबाजीतून कायमची सुटका होते. खटल्यामध्ये साक्षी पुरावा, उलटतपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातात. निकाल झटपट लागतो. तसेच लोकन्यायालयात निकाली निघणाºया प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम प्रत मिळते. त्यामुळे पक्षकारांची वेळ आणि पैसे यामध्ये बचत होते. लोक न्यायालयामध्ये परस्पर संमतीने निकाल होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटुता निर्माण होत नाही. त्यामुळे संबंधित पक्षकारांनी राष्ट्रीय लोक न्यायालयामध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने मिटवावेत, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव यांनी केले आहे.