लोक अदालत : न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर होणार सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 12:23 PM2020-12-06T12:23:07+5:302020-12-06T12:23:18+5:30
वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयात १२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयात १२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालत होणार असून, यावेळी दाखलपूर्व व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांवर सुनावणी होणार आहे. पक्षकारांनी सामंजस्याने प्रकरणे निकाली काढण्यासाठी लोकअदालतमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले.
राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये धनादेश अनादर प्रकरणे, बँकेचे कर्ज वसुली प्रकरणे, कामगाराचे वाद, विद्युत आणि पाणी देयक बद्दलची प्रकरणे व आपसात तडजोड करण्याजोगे फौजदारी प्रकरणे, मोटार अपघात नुकसानभरपाई, वैवाहिक वाद, भू-संपदान प्रकरणे, इतर दिवाणी प्रकरणे (मनाई हुकुम दावे, विशिष्ट पूर्वबंध कराराची पूर्तता विषयक वाद) या संवर्गातील प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात येणार आहेत. ज्या पक्षकारांची उपरोक्त प्रकारची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत किंवा खटलापूर्व प्रकरणे न्यायालयात दाखल आहेत, त्यांनी १२ डिसेंबर २०२० रोजी ही प्रकरणे आपसांत सामंजस्याने निकाली काढण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये सहभाग नोंदवावा. तसेच संबंधित न्यायालय, तालुका विधी सेवा समिती अथवा वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव पी. पी. देशपांडे व विधिज्ञ संघाच्या अध्यक्ष अॅड. छाया मवाळ यांनी केले.