उन्हाच्या कडाक्याचा अक्षय्य तृतीयेच्या खरेदीवरही परिणाम
By नंदकिशोर नारे | Published: May 9, 2024 03:37 PM2024-05-09T15:37:16+5:302024-05-09T15:37:50+5:30
या मुहूर्तावर वाहने, साेने , चांदी खरेदीलाही महत्व दिल्या जाते
वाशिम : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दिवस अक्षय्य तृतीया हा पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. या दिवशी मातीचे मडके आणून, त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकतात.
शुक्रवारी होणाऱ्या अक्षय्य तृतीयेनिमित्त बाजारपेठेत अनेकांनी मातीच्या मडक्यांची, पळसाच्या पानांच्या पत्रावळीची दुकाने थाटली होती. तथापि, उन्हाच्या कडाक्यामुळे दुपारच्या सुमारास या दुकानांवरही शुकशुकाट पाहायला मिळाला. या मुहूर्तावर वाहने, साेने , चांदी खरेदीलाही महत्व दिल्या जाते, परंतु दुपारच्यावेळी या प्रतिष्ठांनावरही गर्दी दिसून आली नाही. संध्याकाळच्यावेळी गर्दी वाढण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त हाेत आहे.