जिल्ह्यात जोरदार पाऊस; नदी-नाल्यांना पूर
By admin | Published: June 16, 2017 01:48 AM2017-06-16T01:48:41+5:302017-06-16T01:48:41+5:30
पेरण्या खोळंबण्याचे संकेत : शेतकरी पुन्हा चिंतातूर!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात गुरुवारी दुपारपासून सर्वदूर जोरदार पाऊस झाला. यामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून, काही ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली. संततधार स्वरूपातील या पावसामुळे दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली पेरणीची कामे खोळंबणार असल्याचे संकेत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
गुरुवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे मानोरा तालुक्यातून वाहणारी अरुणावती नदी दुथडी भरून वाहिली. दिग्रस रोडवरील नाल्याला पूर गेल्याने या मार्गावरील वाहतूक बराच वेळ खोळंबली होती. सायंकाळी उशिरा पूर ओसरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. शेलुबाजार (ता. मंगरूळपीर) येथून जवळच असलेल्या शेलुबाजार-शेंदूरजना मोरे रस्त्यावरील खारी नाल्याला मोठा पूर गेला. मालेगाव तालुक्यातील राजुरा, किन्हीराजा, जऊळका रेल्वे येथेही दमदार पाऊस झाल्याने परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत असून, या पावसामुळे पेरणीची कामे खोळंबणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वाशिम शहरासह तालुक्यातही दुपारपासून सायंकाळी उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.
अनेक गावांमधील वीज पुरवठा खंडित
गुरुवारी दुपारनंतर विजांचा कडकडाट आणि सुसाट्याचा वारा सुटून झालेल्या पावसादरम्यान विद्युत वाहिन्या तुटल्याने अनेक गावांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. किन्हीराजा परिसरातील काही गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत झालेला नव्हता.
प्रकल्पांची पाणीपातळी वाढली!
बुधवार आणि गुरुवारी झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.