जिल्ह्यात दमदार पाऊस, शेतकरी सुखावला! पुढील दोन दिवस 'येलो अलर्ट'
By दिनेश पठाडे | Published: July 5, 2023 04:41 PM2023-07-05T16:41:24+5:302023-07-05T16:42:36+5:30
बुधवारी ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यात पावसाने लावली जोरदार हजेरी
दिनेश पठाडे, वाशिम: यंदा मान्सून लांबल्याने जिल्ह्यात आधीच पावसाची प्रचंड तूट निर्माण झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे पुनरागमन झाले. बुधवारीही सर्वदूर पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने ४ जुलैला वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील चार दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. ५ जुलै रोजी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला.
नागपूर येथील प्रादेशिक हवामान खात्याने ४ जुलै रोजी दुपारी वर्तविलेल्या अंदाजानुसार ५ ते ९ जुलैदरम्यान जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला. ५ जुलैला काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ६ व ७ जुलैला सर्वत्र मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून या दोन दिवसात एक दोन ठिकाणी विजेच्या कडकटासह पावसाची शक्यता आहे. या कालावधीत येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर ८ आणि ९ जुलैला बहुदा सर्वत्र भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. हवामान विभागाकडून दररोज पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यानुसार पुढील पाच दिवसाचे शक्यता वर्तविली जाते. दररोज व्यक्त केलेल्या अंदाजाकडे शेतकऱ्यांचे लक्ष असते. दरम्यान, जिल्ह्यात पावसाने आगमन केल्याने शेतकरी सुखावला असून अनेक भागातील रखडलेली पेरणी पूर्णत्वास जाणार आहे.
बुधवारी ऑरेंज अलर्ट, जिल्ह्यात दमदार पाऊस
नागपूर हवामान प्रादेशिक विभागाकडून ५ जुलैला वर्तविलेल्या अंदाजानुसार बुधवारी(दि.५) ऑरेंज अलर्टचा इशारा दिला होता. यादिवशी जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तविली होती. तसेच विजांच्या कडकटासह वादळ आणि काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची अंदाज वर्तविला होता. हवामान खात्याने दिलेला हा अंदाज खरा ठरल्याचे चित्र पहावयास मिळाले. बुधवारी जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पाऊस बरसला.