जिल्ह्यात पावसाचा धडाका; सरासरी निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:24 AM2021-07-23T04:24:59+5:302021-07-23T04:24:59+5:30

वाशिम : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गत आठवड्यात जिल्ह्यात पुनरागमन करणाऱ्या पावसाने धडाका लावला आहे. गत दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप ...

Heavy rains in the district; On average half | जिल्ह्यात पावसाचा धडाका; सरासरी निम्म्यावर

जिल्ह्यात पावसाचा धडाका; सरासरी निम्म्यावर

Next

वाशिम : पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर गत आठवड्यात जिल्ह्यात पुनरागमन करणाऱ्या पावसाने धडाका लावला आहे. गत दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने खरीप पिके संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढत असून, तुम्ही फोफावले असताना पावसाची रिपरिप सुरू असल्याने तण व्यवस्थापन व कीड नियंत्रणात खोळंबा निर्माण झाल्याने शेतकरी उघाडीची प्रतीक्षा करीत आहेत.

जिल्ह्यात जून महिन्यात सुरुवातीपासूनच दमदार पाऊस पडू लागल्याने शेतकरी सुखावला होता. मान्सूनपूर्व पावसाच्या आधारेच जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी वेग धरला होता. त्यानंतर पेरणी करूनही पावसाने दडी मारल्याने शेतीपिके संकटात होती. सुरुवातीला केलेल्या पेरणीतील पिके वीतभर वाढली; परंतु जूनच्या मध्यानंतर दडी मारल्यानंतर जुलै महिना उजाडला तरी पावसाची सर नसल्याने शेतकरी पावसाकडे नजर लावून होता. ग्रामीण भागात पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करण्यात आली होती. त्यात तूर, कपाशी, उडीद, मूग, सोयाबीन व इतर पिकांची चांगली उगवण झाली होती; पण पावसाने दडी मारल्याने खरीप पिके पिवळी पडू लागली होती; पण गत आठवड्यात पावसाचे पुनरागमन झाल्याने पिकांना आधार मिळाला; परंतु आठवडाभरापासून पावसाने ठाण मांडल्याने आता पिके संकटात सापडण्याची शक्यता आहे. बुधवार आणि गुरुवारीही अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरूच होती.

---------------------------

२४ तासांत ६३ मि.मी. पावसाची नोंद

गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात वाशिम ४९.४, रिसोड ४५.१, मालेगाव ५७.२, मंगरूळपीर ११४.६, , मानोरा ६५.८, कारंजा ५९.२, असे पावसाचे प्रमाण आहे. दरम्यान, गत पाच दिवसांतच जिल्ह्यात सरासरी १०० मि‌.मी.पेक्षा अधिक ‌पावसाची नोंद झाली आहे.

---------------------------------

काही भागांत दिलासा

गत आठवडाभरापासून पावसाने रिपरिप लावल्याने बहुतांश भागातील पिके संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली असली तरी काही भागांत मात्र या पावसामुळे दिलासाही मिळाला आहे. प्रामुख्याने कारंजी आणि मानोरा तालुक्यांतील पावसाचे प्रमाण कमी असताना गत दोन दिवसांत आलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे.

-------------------------------------

तूर, सोयाबीनवर परिणाम

गत तीन दिवसांत अनेक भागांत सतत पाऊस पडल्याने शेतजमिनीत मोठ्या प्रमाणात ओल निर्माण झाली आहे. याचा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. प्रामुख्याने काही भागांत तूर आणि सोयाबीन पीक पिवळे पडते असल्याचे निरीक्षण कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी नोंदविले आहे. तथापि, पावसाने उसंत घेतल्यास ही पिके सावरणार आहेत.

-----------------------------

कोट : गत दोन दिवसांतच पावसाचे प्रमाण अधिक झाले. सद्य:स्थितीत पिके चांगली आहेत; परंतु पावसाचे प्रमाण पुढे चार पाच दिवस असेच राहिले, तर पिके पिवळी पडण्यास सुरुवात होईल. ज्या जमिनीत पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो. त्या जमिनीतील पिकांना मात्र धोका नाही.

- डॉ. रवींद्र काळे,

वरिष्ठ शास्त्रज्ञ, तथा प्रमुख

क‌षी विज्ञान केंद्र वाशिम

_-----------------------

कोट: सुरुवातीला पावसाने खंड दिल्यामुळे पिके संकटात सापडली होती, तर आता गत तीन, चार दिवसांपासून पावसाने धडाकाच लावला आहे. त्यामुळे पिके पिवळी पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शिवाय सत्तरच्या पावसाने तण व्यवस्थापनात खोळंबा निर्माण केला आहे.

- - दिगंबर पाटील उपाध्ये,

शेतकरी, काजळेश्वर

---------------------------------

Web Title: Heavy rains in the district; On average half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.