मुसळधार पावसामुळे पाणी शिरले घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:24 AM2021-07-24T04:24:25+5:302021-07-24T04:24:25+5:30
आसेगाव परिसरात गत आठवडाभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतजमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान ...
आसेगाव परिसरात गत आठवडाभरापासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, शेतजमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. अशात २१ जुलैच्या मध्यरात्रीनंतर परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस २२ जुलै रोजी सकाळी ५ वाजेपर्यंत कोसळत होता. पावसाचे प्रमाण एवढे होते की, परिसरातील चिंचखेडा गावात मागासवर्गीय वस्तीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. हे पाणी ग्रामस्थांच्या घरात शिरल्याने ग्रामस्थांची त्रेधा तिरपिटी उडाली. लहान मुलांसह परिसरातील कुटुंबांना अर्ध्या रात्री गावातील व्यायामशाळेत आसरा घ्यावा लागला. सकाळी उशिरापर्यंत या ग्रामस्थांना घरात शिरलेले पाणी बाहेर फेकावे लागले. या पावसामुळे ग्रामस्थांच्या घरातील बिछाना, पांघरुणासह जीवनावश्यक वस्तू आणि जेवणाचे साहित्यही वाहून गेले. यात सर्वाधिक फटका मधुकर नारायण सोळंके यांना बसला. शिवाय मैना भास्कर खडसे, केशव वानखडे आणि महादेव वानखडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या ग्रामस्थांना घरकूल योजनेचा लाभ न मिळाल्याने त्यांच्यावर ही परिस्थिती ओढावली असून, स्थानिक ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन घरकूल योजनेचा लाभ देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
------
तान्हुल्याला सोबत मातेची धावाधाव
चिंचखेडा येथे २१ जुलै रोजी मध्यरात्रीनंतर जोरदार पाऊस पडल्याने ग्रामस्थांना व्यायामशाळेच्या इमारतीचा आधार घ्यावा लागला. त्यात या पावसाचे पाणी घरात शिरल्याने काही महिन्यांपूर्वीच प्रसूती झालेल्या मातेला तिच्या चिमुकल्याच्या सुरक्षेसाठी पावसात घराबाहेर पडून धावाधाव करावी लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.