३.५ लाख हेक्टरवरील पिकांना दमदार पावसाने तारले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 01:23 AM2017-08-21T01:23:45+5:302017-08-21T01:24:14+5:30
वाशिम : २0 ते २५ दिवसांपासून गायब झालेला पाऊस शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धो-धो कोसळला. सरासरी ३६ मि.मी. नोंद झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील ३.५ लाख हेक्टरवरील सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांना मोठा आधार मिळाला आहे. दरम्यान, मूग पिकाची काढणी सुरू असल्याने शेतकर्यांची धांदल उडत असल्याचेही दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

यावर्षी मृग नक्षत्रादरम्यान चांगला पाऊस झाला. त्याआधारे जिल्ह्यात ३.५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर खरिपातील पिकांची पेरणी झाली. त्यानंतर मात्र पावसाने वारंवार हुलकावणी दिल्यामुळे पिके धोक्यात सापडली होती. यासोबतच मध्यम आणि लघुप्रकल्पांची पाणीपातळीही चिंताजनक स्वरूपात घटली होती.
अशातच शनिवारी दिवसभर तुरळक स्वरूपात झालेल्या पावसाने रविवारी पहाटे तीन वाजेपासून सात वाजेपर्यंत दमदार हजेरी लावल्याने धोक्यात सापडलेल्या पिकांना जीवदान मिळण्यासोबतच जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पाणी पातळीतही किंचितशी वाढ झाली आहे. असे असले तरी आगामी रब्बी हंगामासाठी तद्वतच पिण्याच्या पाण्याकरिता किमान तीन ते चार मोठय़ा पावसांची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. दरम्यान, पोळ्याच्या पूर्वसंध्येला कोसळलेल्या या पावसामुळे शेतकरी मात्र सुखावला आहे.
पावसामुळे आठवडी बाजार विस्कळित
रविवारी सायंकाळी ६.१५ च्या सुमारास पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावली. यादिवशी वाशिमचा आठवडी बाजार होता. त्यातच सोमवारच्या पोळा सणानिमित्त ग्राहकांची तोबा गर्दी झाली होती. पावसामुळे मात्र व्यावसायिकांसोबतच ग्राहकांचीही मोठी तारांबळ उडाली.