आसेगाव पोलिसांच्यावतीने ‘सलोखा दौड’ उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:38 AM2017-07-18T00:38:58+5:302017-07-18T00:38:58+5:30
जातीभेद दूर करण्याचे आवाहन: शेकडो विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगांव: पोलीस स्टेशन आसेगाव अंतर्गत येणाऱ्या ५२ गावांतील जातीभेद नष्ट करण्याचे आवाहन करून आगामी धार्मिक सणउत्सव शांततेत साजरे करण्याचा संदेश देण्यासाठी जातीय पोलिसांच्यावतीने सोमवार १७ जुलै रोजी ‘सलोखा दौड’चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात पोलीस कर्मचारी, तसेच धानोरा येथील शाळांमधील शिक्षकवृंदांसह विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आदेशानुसार सोमवार १७ जुलै रोजी सकाळी १० वाजता आसेगाव पोलिसांकडून सोमवारी सलोखा मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमात धानोरा खुर्द येथील धानोरकर आदर्श उच्चप्राथमिक, माध्यमिक व उच्चमाध्यमिक माध्यमिक शाळेमधील ५ वी ते. १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक मंगेश धानोरकर, कर्मचारी, दिनेश चव्हाण, अमोल घुले उर्फ बंटी पाटील, तसेच आसेगाव पोलीस स्टेशनमधील सर्वच कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. धानोरकर आदर्श विद्यालयाच्या प्रांगणापासून ते एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बसथांब्यापर्यंत ही सलोखा दौड घेण्यात आली. या मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान जातीभेद दूर सारून आगामी गणेशोत्सव, बकरी-ईद, तसेच दूर्गोत्सव हे सणउत्सव शांततापूर्ण वातावरणात साजरे करण्याचे आवाहन करणाऱ्या घोषणा देण्यात आल्या. आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गिराटा, गोस्ता, खेर्डा, चिखलागड, गिर्डा, रणजीतनगर, उज्वल नगर, वार्डा, साळंबी, सावरगांव , भिलडोंगर, खापरदरी, हळदा, विळेगांव, खांबाळा, रुई, पाळोदी, ढोणी, शेंदुरजना, चिंचोली, दाभडी, रामगड़, मथुरा तांडा भडकुंभा, वटफळ, मेंद्रा, इंगलवाडी, हिवरा, सनगांव, शेगी, चिचखेडा, रामगांव, मोतसावंगा, ईचोरी, फाळेगांव, सार्सी, मसोला, दस्तापूर, बिटोडा, कळंबा, कासोळा, धानोरा, नांदगाव, शिवणी, लही, वसंतवाड़ी, वाराजहांगीर , देपूळ, कुंभी, आसेगाव आणि पिंपळगाव आदि ५२ गावांतील जातीभेद दूर सारून आगामी सणउत्सव शांततेत साजरे करण्याचे आवाहन करण्यासाठी आसेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव आणि पोलीस उपनिरीक्षक अमोल जाधव यांच्या मार्गदर्शनात या सलोखा दौडचे आयोजन करण्यात आले होते.