पटेलांच्या नावाचा वारसा जपणारी शाळा
By admin | Published: October 31, 2014 01:36 AM2014-10-31T01:36:18+5:302014-10-31T01:36:18+5:30
वाशिम येथीज नगर परिषद सरदार वल्लभभाई पटेल शाळा, १३५ विद्यार्थी घेताहेत शिक्षण.
शिखरचंद बागरेचा/ वाशिम
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाचा वारसा जपत वाशिम नगर परिषदेच्या सरदार वल्लभभाई पटेल शाळेची वाटचाल १९५0 पासून आजतागायत सुरू आहे. तत्कालीन नगर परिषद अध्यक्ष रा.ब.पाटील यांच्या कारर्कीदीत २0 ऑगस्ट १९५0 रोजी सुरू झालेली सदर शाळा विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे धडे देत आहे.
६४ वर्षांच्या कालावधीत या नगर परिषद शाळेने अनेक चढउतार अनुभवले आहेत. साधारणत: नगर परिषदेची शाळा म्हटले की पालक व विद्यार्थी या शाळेकडे पाठ फिरवितात; मात्र सरदार वल्लभभाई नगर परिषद शाळा वाशिम येथे स्पर्धेच्या युगातही वर्ग एक ते चारमध्ये विद्यार्थ्यांची संख्या १३५ आहे. नवीन आरसीसी इमारतीत दहा वर्गखोल्यांमधून पाच शिक्षक १३५ विद्यार्थ्यांना शिकवित आहेत. २0१३ पर्यंत दुलाराम बसंतवाणी आणि आता रामेश्वर प्रल्हाद जायभाये हे मुख्याध्यापक म्हणून या शाळेचा कारभार हाकत आहेत. साधारणत: जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या शाळांकडे स्पर्धेच्या युगात पालकांचा फारसा कल राहिला नाही; मात्र दज्रेदार शिक्षण मिळत असेल तर शासनाच्या अनेक शाळा ६0 वर्षांनंतरही आपले अस्तित्व टिकवून आहेत. त्यापैकीच वाशिम शहरातील सरदार वल्लभभाई पटेल नगर परिषद प्राथमिक शाळा आहे. येथे सद्यस्थितीत मुख्याध्यापक रामेश्वर जायभाये यांच्यासह दोन शिक्षिका व दोन शिक्षक कार्यरत आहेत. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय तसेच मुला-मुलींसाठी स्वतंत्र पाण्याच्या सोयीयुक्त स्वच्छता गृह उपलब्ध आहे.