नव्या वाहनांना ‘हाय सिक्यूरिटी’; १ एप्रिलपूर्वीची वाहने सुरक्षा कक्षेबाहेबरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 05:07 PM2019-05-19T17:07:05+5:302019-05-19T17:07:17+5:30
नव्या वाहनांनाच हा नियम लागू करण्यात आला असून १ एप्रिलपूर्वीची वापरात असलेली जुनी वाहने सुरक्षा कक्षेबाहेरच राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : चोरट्यांपासून सुरक्षा आणि नियमबाह्य पद्धतीने लावण्यात येणाऱ्या नंबर प्लेटच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी १ एप्रिलपासून ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (एचएसआरपी) पद्धतीची अंमलबजावणी सुरू झाली; मात्र उत्पादित होणाºया नव्या वाहनांनाच हा नियम लागू करण्यात आला असून १ एप्रिलपूर्वीची वापरात असलेली जुनी वाहने सुरक्षा कक्षेबाहेरच राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी शनिवारी दिली.
वाहन चोरी, अपघात व गुन्ह्यांची उकल करताना येणाºया अडीअडचणी दूर करण्यासाठी वाहनांना ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. उच्च तंत्रज्ञान वापरून बनविण्यात येणाºया या नंबर प्लेटवर इलेक्ट्रॉनिक चिप तसेच सेन्सॉर असणार आहे. यात वाहनधारकांची संपूर्ण माहिती असणार आहे.
सेन्सॉरमुळे वाहनाचा गैरवापर होत असल्यास संबंधित यंत्रणेला त्याची माहिती लगेचच प्राप्त होणार आहे. चोरट्याने वाहनाची नंबर प्लेट काढण्याचा अथवा बदलण्याचा प्रयत्न केल्यास तसा संदेश संबंधित वाहनमालकाच्या मोबाईलवर लगेचच प्राप्त होणार आहे. त्यामुळे चोरीला गेलेल्या वाहनाचा तपास लवकर लागण्यास मोठी मदत मिळेल. मात्र, १ एप्रिलपासून उत्पादित होणाºया नव्या वाहनानाच ही नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली असून जुनी वाहने त्यातून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे १ एप्रिलपूर्वीची जुनी वाहने चोरीला गेल्यास किंवा वाहनांचा अपघात झाल्यास त्यावर कुठलाही ठोस पर्याय शोधण्यात आलेला नाही, असे सूत्रांनी सांगितले.
‘इन्फ्रारेड’ पद्धतीने ‘हाय सिक्युरीटी नंबर प्लेट’वरील सांकेतिक माहिती पाहण्यासाठी पोलीस आणि आरटीओजवळ ‘स्कॅनर’ची सुविधा असणार आहे. दुरवरूनही ही नंबर प्लेट स्कॅन करता येणार आहे. यामुळे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची माहिती देखील तातडीने मिळणार असल्याने पोलिसांना मोठी मदत मिळणार आहे.