महसूल, पोलीस खात्यात लाचखोरांचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 12:15 PM2021-02-23T12:15:57+5:302021-02-23T12:25:05+5:30
Washim News दोन वर्षांत लाच स्वीकारताना १० पोलीस, तर आठ महसूल कर्मचारी जेरबंद करण्यात आले.
वाशिम : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१९ व २०२० या दोन वर्षांत व चालू वर्षात आतापर्यंत लाच स्वीकारल्याप्रकरणी एकूण ४० कारवाया केल्या. त्यात महसूल व पोलीस खात्यातच लाचखोरांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. दोन वर्षांत लाच स्वीकारताना १० पोलीस, तर आठ महसूल कर्मचारी जेरबंद करण्यात आले.
प्रशासन भ्रष्टाचारमुक्त व्हावे, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय लाचलुचपत प्रतिबंधक विभागही भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांवर ‘वॉच’ ठेऊन आहे. असे असताना २०१९ ते २०२१ या कालावधीत जिल्ह्यातील प्रशासकीय विभागात भ्रष्टाचार झाल्याची ४० प्रकरणे उघडकीस आली, तर ३० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे पोलीस व महसूल खात्यातीलच आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार करणाऱ्यांची
३१ ते ४० मधील कर्मचाऱ्यांना पैशाचा मोह आवरेना
लाच स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वयोगटानुसार वर्गीकरण केले असता, ३१ ते ४० या वयोगटांतील कर्मचाऱ्यांचाच त्यात अधिक भरणा असल्याचे दिसून येत आहे. २०१९ ते २०२१ या कालावधीत या वयोगटातील १४ कर्मचाऱ्यांनी पैशाच्या मोहाला बळी पडून लाच स्वीकारली. संबंधितांवर ‘अॅन्टी करप्शन ब्युरो’कडून कारवाई करण्यात आली.
२०१९ मध्ये ४ पोलीस कर्मचारी, १ महसूल कर्मचारी, १ न.प. कर्मचारी, १ भूमी अभिलेख, २ नगरपंचायत, ३ शिक्षण विभाग, २ कृषी विभाग, २ ऊर्जा विभाग व ३ खासगी/इतर लोकसेवकांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.
२०२० मध्ये ७ महसूल कर्मचाऱ्यांनी लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. पोलीस विभागातील ६ कर्मचारी, ऊर्जा, सहकार व पंचायत विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्यास या प्रकरणी जेरबंद करण्यात आले, तर २०२१ मध्ये ग्रामविकास आणि पंचायत विभागातील कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागास तक्रार करणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवली जातात. तक्रार प्राप्त झाल्यानंतर सापळा रचून २०१९ ते २०२१ या कालावधीत एकूण ४० कारवाया करण्यात आल्या. सखोल तपासाअंती त्यातील ३० प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नागरिकांनी कुठलीही भीती न बाळगता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल करावी. तत्काळ दखल घेतली जाईल.
- निवृत्ती बोराडे, लाचलुचपत विभाग, वाशिम