उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाच्या क्षेत्रातील शिरपुरात सर्वाधिक पर्जन्यमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:30+5:302021-06-21T04:26:30+5:30
यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथे पावसाचे प्रमाण सर्वाधिक असून, गत २० दिवसांत ...
यंदा जूनच्या सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. त्यात वाशिम जिल्ह्यातील शिरपूर येथे पावसाचे प्रमाण सर्वाधिक असून, गत २० दिवसांत शिरपूर परिसरात ३२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांतर्गत वाशिम, हिंगोली, बुलडाणा या तीन जिल्ह्यातील १२ पाणलोट क्षेत्रात समाविष्ट प्रकल्पांपैकी पेनटाकळी २६०, साखरखेर्डा २३२, मेहकर २३९, डोणगाव २११, रिसोड २४३, गोवर्धन २४४, शिरपूर ३२८, गोरेगाव २१२, कनेरगाव १०९, अनसिंग १८५, सिरसम १०२, खंडाळा १४६, इसापूर १३९, असे पावसाचे प्रमाण असून, यात शिरपूर येथील पावसाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे अहवालात स्पष्ट झाल्याची माहिती शिरपूर येथील पर्जन्यमापक गजानन वाढे यांनी दिली आहे. मागील वर्षी शिरपूर येथे एकूण १२२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती.
---------------
महिन्यात केवळ दोनच दिवस निरंक
शिरपूर येथे जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाचा धडाका सुरू आहे. १ जूनपासून २० जूनपर्यंतच्या कालावधीत केवळ ३ आणि २० जून हे दोनच दिवस वगळता इतर सर्वच दिवसांत शिरपूर येथे पाऊस पडला आहे. त्याचा बराच परिणाम जनजीवनावरही झाला आहे.
^^^^^^^^^^^
पावसामुळे पेरण्या खोळंबल्या
शिरपूर येथे जूनच्या सुरुवातीपासूनच सतत पाऊस पडत असून, या महिन्यात १८ दिवस पावसाचे राहिले आहेत. यामुळे शेतात पाणी साचून राहिले, तर पावसाच्या रिपरिपीमुळेही शेतकऱ्यांना पेरणी करणेही कठीण झाल्याचे दिसत आहे.