महामार्गावरील दुभाजक तोडले; चालकांचे टेन्शन वाढले
By संतोष वानखडे | Published: January 27, 2024 04:01 PM2024-01-27T16:01:49+5:302024-01-27T16:02:10+5:30
जिल्हयातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ जातो. काही महिन्यांपूर्वीच या महामार्गाचा राष्ट्रार्पण सोहळा पार पडला.
वाशिम : अकोला ते हैदराबाद या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील मेडशी ते वाशिम या दरम्यानच्या रस्त्यावरील काही ठिकाणी दुभाजक तोडून चुकीच्या पद्धतीने दुचाकी किंवा अन्य वाहने दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर आणले जातात. या प्रकारामुळे अपघाताची शक्यता बळावली असून, महामार्गावरील दुभाजक तोडणाऱ्यांवर कारवाई करावी, असा सूर वाहनधारकांमधून उमटत आहे.
जिल्हयातून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ जातो. काही महिन्यांपूर्वीच या महामार्गाचा राष्ट्रार्पण सोहळा पार पडला. या महामार्गावरुन सुसाट वेगाने वाहने धावतात. मात्र मालेगाव तालुक्यातील मेडशी ते वाशिम दरम्यान अनेक ठिकाणी रस्त्यांच्या मधातील दुभाजक तोडून अवैध रस्ते बनविण्यात आले. त्यामुळे रस्त्यावरुन भरधाव वेगाने जाणारे वाहन व दुभाजक तोडलेल्या ठिकाणावरून वळण घेणाऱ्या वाहनांमध्ये भीषण अपघात होण्याचा धोका वाढला आहे. यापूर्वीदेखील काही वेळा तोडलेले दुभाजक पूर्ववत करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्यावतीने करण्यात आले. परंतू, त्यानंतरदेखील दुभाजक तोडले जात आहेत. या प्रकारामुळे अपघाताची शक्यता वाढत असल्याने याकडे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षकांनी वेळीच लक्ष देणे अपेक्षित ठरत आहे.
जिल्हाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण वाशिमचे कार्यकारी अभियंत्यांनी यापूर्वी तोडलेले दुभाजक नव्याने बांधले. मात्र, वारंवार दुभाजक तोडून अवैध रस्ते बनविले जात असल्यामुळे त्यांनी थेट जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांशी याबाबत पत्रव्यवहार केला.