महामार्ग कामातील हलगर्जीचा फटका वाहतुकीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 05:28 PM2018-11-20T17:28:58+5:302018-11-20T17:30:00+5:30
अवकाळी पावसामुळे महामार्गावरील लहान पुलाच्या कामानजिक टाकलेल्या माती मिश्रीतब मुुरुमाचा चिखल झाला आणि वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील हलगर्जीचा फटका वाहतुकीला बसला आहे. सोमवारी मध्यरात्री आलेल्या अवकाळी पावसामुळे महामार्गावरील लहान पुलाच्या कामानजिक टाकलेल्या माती मिश्रीतब मुुरुमाचा चिखल झाला आणि वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प झाली. याचा नाहक त्रास प्रवासी व मालवाहू वाहनधारकांना सोसावा लागला.
जिल्ह्यात वाशिम-हिंगोली, कारंजा-वाशिम, मंगरुळपीर-आर्णी, मालेगाव-मेहकर, या मार्गांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या मार्गांचे चौपदरीकरण राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणमार्फत करण्यात येत आहे. या कामांचे कंत्राट घेणाºया कंपन्यांनी कामाला वेगही दिला. याच मार्गावर काही ठिकाणी लहान पुलांची निर्मिती करण्यात येत असून, हे काम करताना वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून वळणमार्ग काढण्यात आले आहेत. हे वळणमार्ग काढताना मुरुमाचा वापर करून दबाई करण्यात आली. तथापि, वाशिम मंगरुळपीर मार्गावर सुरू असलेल्या पुलांच्या ठिकाणी वळणमार्ग काढताना वापरलेल्या मुरुमात मातीचे प्रमाण अधिक आहे. त्यात १९ नोव्हेंबरच्या रात्री या मार्गावरील विविध गावांत जोरदार अवकाळी पाऊस पडला. त्या पावसामुळे पुलांच्या ठिकाणी काढलेल्या वळणमार्गावर मातीमुळे चिखल तयार झाला आणि या ठिकाणी वाहने फसू लागली. वाशिम-मंगरुळपीर मार्गावरील बिटोटा भोयरपासून काही अंतरावर एका पुलाच्या ठिकाणी वळणमार्गावर तेलाचा टँकर फसला. हा टँकर काढण्यासाठी महामार्गाच्या कामासाठी आणलेल्या जेसीबीचा आधार घ्यावा लागला. याला तासभर वेळ लागल्याने मार्गावर दोन्ही बाजून वाहनांची जवळपास अर्धा किलोमीटर अंतराची रांगच लागली होती. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.
वाहन काढण्यासाठी आलेली जेसीबीही फसली
मंगरुळपीर-वाशिम मार्गावरील बिटोटा भोयरपासून काही अंतरावर एका पुलाच्या ठिकाणी वळणमार्गावर फसलेला टँकर काढण्यासह वाहतूक सुरळीत करण्यासाठी जेसीबी मशीनचा आधार घेण्यात आला; परंतु टँकर बाहेर काढल्यानंतरही मार्ग मोकळा करण्याच्या प्रयत्नात ही मशीनच चिखलात फसली. ती बाहेर काढण्यासाठी दुसºया मशीनचा आधार घ्यावा लागल्याने वाहतुकीला अधिकच फटका बसला.