धुलीवंदनानिमित्त विविध रंगांनी सजली बाजारपेठ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 05:58 PM2019-03-19T17:58:53+5:302019-03-19T17:59:10+5:30
मालेगाव (वाशिम) : दोन दिवसांवर आलेल्या धुलीवंदनानिमित्त विविध स्वरूपातील रंगांनी येथील बाजारपेठ सजली असून मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव (वाशिम) : दोन दिवसांवर आलेल्या धुलीवंदनानिमित्त विविध स्वरूपातील रंगांनी येथील बाजारपेठ सजली असून मंगळवारी असलेल्या आठवडी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचे दिसून आले. विविध प्रकारचा सुका रंग, पिचकारी, मुखवटे यासह अन्य साहित्य खरेदीकरिता उपलब्ध झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून शहरी भागात होळी आणि रंगपंचमी या सणांचे स्वरूप पालटले असले तरी ग्रामीण भागात मात्र आजही जुन्याच रुढी-परंपरेनुसार हे सण साजरे केले जातात. शेणामातीच्या विविध आकारातील चाकोल्या, एरंडाची झाडे, लाकडांचा वापर करून होळी पेटविण्याची परंपरा असून त्याच्या तयारीत अबालवृद्ध लागले आहेत. जिथे कुठे गुरांचे शेण मिळेल, तेथून ते आणायचे आणि त्यात थोडीफार माती मिसळवून सुंदर चाकोल्या तयार करायच्या. होळीपर्यंत त्या उन्हात सुकवून त्याची माळ तयार करण्याची तयारी सद्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. या कामात विशेषत: ग्रामीण भागातील चिमुकली मुले आनंदाने गुंतली आहेत.
पुर्वी पळसाच्या फुलांपासून रंग तयार केला जायचा. आता मात्र तयार रंग बाजारात मिळत असल्याने लोकांची सोय झाली आहे. बाजारपेठेत यावर्षी रंग थोडे महाग झाल्याने व पाणीटंचाईमुळे रंगोत्सवावर काहीसा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.