सुट्या संपल्या, चिमुकले पुन्हा ‘ऑनलाईन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:28 AM2021-06-26T04:28:02+5:302021-06-26T04:28:02+5:30
दरवर्षी साधारणत: २८ जूनपासून राज्यभरातील सर्वच शाळा सुरू होतात; मात्र गतवर्षी मार्च, एप्रिल या महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट ...
दरवर्षी साधारणत: २८ जूनपासून राज्यभरातील सर्वच शाळा सुरू होतात; मात्र गतवर्षी मार्च, एप्रिल या महिन्यांपासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट उद्भवले. त्यानंतर काहीच दिवसांत सर्वच ठिकाणच्या शाळा बंद करण्याचे फर्मान शासनस्तरावरून सुटले. २०२०-२१ चे नवे शैक्षणिक सत्र यामुळे सुरू होऊ शकले नाही. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या दोन लाटानंतर आता तिसरी लाटही येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेषत: या लाटेत लहान मुले बाधित होतील, असे संकेत आहेत. त्यामुळेच २०२१-२२ चे नवे शैक्षणिक सत्रही सुरू होण्याबाबत अद्यापपर्यंत शासनस्तरावरून कुठलीही ठोस हालचाल झालेली नाही.
दुसरीकडे शासकीय शाळांप्रमाणेच खासगी शाळांनीही २०२०-२१ च्या शैक्षणिक सत्रात ऑनलाईन शिक्षण पुरविले. उन्हाळी सुटी संपल्यानंतर नव्या शैक्षणिक सत्रालाही ऑनलाईन पद्धतीनेच सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थी मोबाईल, लॅपटाॅप, संगणकांवरून ऑनलाईन क्लासेस करण्यात गुंतल्याचे दिसून येत आहे.
..........................
यंदाही वाजणार नाही शाळांची घंटा
जिल्ह्यात शासकीय आणि खासगी स्वरूपातील पहिली ते १२ वीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या एकूण १३७८ शाळा आहेत. त्यातील खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणे सुरू केले आहे; मात्र जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या अखत्यारित असलेल्या शाळा दरवर्षीप्रमाणे यंदाही २८ जूनपासून सुरू होणार आहेत. विद्यार्थी शाळेत जाणार नाहीत; मात्र दहावी ते बारावीपर्यंतच्या शिक्षकांची शंभर टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. इतर वर्गशिक्षकांसाठी हे प्रमाण ५० टक्के ठेवण्यात आले आहे.
......................
मोफत पाठ्यपुस्तकांची प्रतीक्षा
यंदाही ऑनलाईन पद्धतीनेच नवे शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण केले जाणार आहे; मात्र अद्यापपर्यंत शासनस्तरावरून पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. ती कधी मिळणार, याची प्रतीक्षा विद्यार्थी, पालकांना लागून आहे.