मोबाईलची सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांना घरपोच शिक्षणाचे धडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 12:25 PM2020-09-13T12:25:27+5:302020-09-13T12:25:36+5:30
विद्यार्थ्यांना शिक्षकांतर्फे समुदाय पद्धतीने गावात, घरपोच प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गामुळे आॅनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. आॅनलाईन शिक्षणासाठी कोणतीही साधने उपलब्ध नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकांतर्फे समुदाय पद्धतीने गावात, घरपोच प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून राज्यातील शाळा बंद आहेत. जुलै महिन्यापासून प्रशासकीय कामकाजासाठी शाळा सुरू आहेत; परंतू, शिक्षणासाठी वर्ग बंद आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असल्याने ३० सप्टेंबरपर्यंतही वर्ग सुरू होणार नाहीत. दरम्यान, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आॅनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांकडे अॅन्ड्राईड मोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नाहीत, कोरोनाच्या काळात अशा विद्यार्थ्यांना आवश्यक ती खबरदारी घेऊन शाळा परिसर, समाजमंदिर, मोकळी जागा येथे समुदाय पद्धतीने शिकविले जात आहे. समुदाय पद्धतीने शिकविताना कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, याची दक्षताही घेण्यात येत आहे. जिल्ह्यात जवळपास ६९ हजार विद्यार्थ्यांकडे अॅन्ड्रॉईड मोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, या दृष्टिकोनातून हा उपक्रम सुरू करण्यात आला.
फिजिकल डिस्टन्सिंगचे होतेय पालन
मोबाईल किंवा अन्य साधने उपलब्ध नसणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देताना मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग आदींचे पालन केले जात आहे. शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून जिल्हाभरात हा उपक्रम राबविला जात आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी सांगितले. असे शिक्षण देताना शिक्षक हे विशेष काळजी घेत असल्याचे मानकर यांनी सांगितले.