घरांच्या पडझडींचा सर्व्हेच नाही!
By admin | Published: August 15, 2016 02:25 AM2016-08-15T02:25:41+5:302016-08-15T02:25:41+5:30
जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या पडझडीचे सर्वेक्षणच नाही; जिल्हा परिषद अध्यक्षाचे पत्र.
वाशिम, दि. १४: जुलै व ऑगस्ट या महिन्यातील अतवृष्टीने जिल्ह्यातील किती घरांची व सिंचन विहिरींची पडझड झाली, याचा सर्व्हे करण्यात आला नाही. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी जिल्हाधिकार्यांना दिले.
जुलैचा संपूर्ण महिना तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. यामुळे बळीराजा सुखावला. मात्र, पावसाचा जोर अधिक असलेल्या भागात काही घरांची पडझड झाली तसेच सिंचन विहिरी खचल्या. या नुकसानाचा सर्व्हे केल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर होणे अपेक्षित आहे. गावपातळीवर सर्वेक्षण झाले नसल्याने नुकसानग्रस्त लाभार्थी शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ जुलै रोजी वाशिम शहरातील पंचशीलनगरमध्ये वाल्मीकी-आंबेडकर आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुलाचे छत कोसळले होते. ग्रामीण भागातही अनेक घरांची पडझड झाली. तसेच सिंचन विहिरी खचल्या आहेत. या नुकसानग्रस्तांना शासनाचे अर्थसहाय्य मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण ग्रामीण भागाचा सर्व्हे करून अहवाल तयार करावा आणि शासनाकडे तातडीने पाठवावा, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केली. यावर शासनाकडे अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.