पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास घरोघरी तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2021 11:26 AM2021-03-11T11:26:30+5:302021-03-11T11:26:39+5:30
Coronavirus News पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील तेथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : वाशिम : जिल्ह्यातील वाढत्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ज्या गावांमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून येतील तेथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी आरोग्य यंत्रणेला सूचनाही दिल्या आहेत.
जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. ऑगस्ट ते सप्टेंबर या दोन महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर कोरोनाचा आलेख खालावला. जानेवारी २०२१ पर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असताना, फेब्रुवारी महिन्यापासून शेजारच्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू झाला. वाशिम जिल्ह्यातही १५ फेब्रुवारीपासून कोरोनाचा कहर सुरू झाला असून, दरदिवशी शंभरावर कोरोनाबाधित आढळून येत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. जिल्ह्यात १५ मार्चपर्यंत जमावबंदी आदेश असून, कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव झाला असून, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून ज्या गावांमध्ये पाचपेक्षा अधिक कोरोनाबाधित आढळून येतील, तेथे घरोघरी जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेला दिले. त्यानुसार आरोग्यवर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांचे आरोग्य कर्मचारी, आशा आदींच्या माध्यमातून पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून आलेल्या गावांमध्ये घरोघरी जाऊन तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना संसर्गाची लक्षणे आढळून येणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणीदेखील केली जाणार आहे. वेळीच उपचार मिळाल्यास कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनीदेखील या मोहिमेला सहकार्य करावे, कोणताही आजार लपवू नये, लक्षणे आढळून येताच कोरोना चाचणीसाठी पुढे यावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार ज्या गावांमध्ये ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत, अशा गावांमध्ये घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी केली जात आहे. नागरिकांनीदेखील या मोहिमेला सहकार्य करावे. कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे.
- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम