देशसेवा करणाऱ्या सैनिकास घर कर माफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 11:20 AM2021-07-01T11:20:23+5:302021-07-01T11:20:29+5:30
Home tax exemption for soldiers serving the country : गावातील सैनिकाच्या घराचा कर माफ करण्याचा ठराव कारखेडा येथे ग्रामपंचायतने बैठकीत घेतला.
- माणिक डेरे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : देशसेवेसाठी आपले प्राण धोक्यात घालून सेवा देणारे व गावाचे नाव देशसीमेवर नेणाऱ्या गावातील सैनिकाच्या घराचा कर माफ करण्याचा ठराव कारखेडा येथे ग्रामपंचायतने बैठकीत घेतला.
कारखेड्याच्या सरपंच्या सोनाली बबनराव सोळंके यांनी २९ जूनच्या मासिक सभेत याबाबत एकमताने ठराव मंजूर केला. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित बैठकीत गावात एक हजार झाडे लावण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. हरीत कारखेडा ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले.
गावातील माजी सैनिक रमेश जयराम जाधव यांचा संपूर्ण घर कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सैनिक रमेश जाधव यांचे ग्रामपंचायत कार्यालयात उभे राहून टाळ्या वाजवून स्वागत करून मोफत पीठगिरणीचे कार्ड देण्यात आले.
आपल्या गावच्या सैनिकानी देशाच्या सीमा सुरक्षित ठेवल्याचा आम्हाला अभिमान आहे अशा सरपंच सोनाली सोळंके यावेळी म्हणाल्या.
यावेळी उपसरपंच अनिल काजळे, सचिव अनिल सूर्य, जि.प.चे मुख्याध्यापक गोविंद पोतदार, रणजित जाधव, पोलीस पाटील वासुदेव सोनोने, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, ग्रामपंचायत सदस्य प्रमिला चव्हाण, गणेश जाधव, नीता जाधव, वर्षा मोहनराव देशमुख, दिलीप देशमुख, चैताली विवेक परांडे, मनोज किशोर तायडे आदी उपस्थित होते.
जाधव परिवाराची तिसरी पिढी देशसेवेत
जाधव परिवाराचा घर टॅक्स ग्रामपंचायतने माफ केला त्या जाधव परिवाराची देशसेवेची पार्श्वभूमी फार मोठी आहे. १९६२ च्या चीनविरुध्दच्या लढाईत जयराम आकाराम जाधव यांच सहभाग होता, रमेश जयराम जाधव यांनी आंतरदेशीय जल वाहतूकमध्ये काम केले तर जाधव परिवाराचा तिसरा वंशज कमलेश रमेश जाधव देशसेवेतून निवृत्त झाला. ते नायक पदावर कार्यरत होते.
कारखेडा ग्रामपंचायतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. नियमित कर भरणाऱ्यांना दळण माेफत यासह विविध याेजना राबविण्यात येतात. कारखेडा ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये माजी सैनिकास घर कर माफ करण्याच्या निर्णयावर एक मत झाल्याने व सर्वांनी सहमती दर्शविल्याने हा निर्णय एकमताने पारित करण्यात आला.
-साेनाली बबनराव साेळंके,
ग्रा.पं. सरपंच, कारखेडा