घरकुल लाभार्थी रोजगार हमीच्या पैशांपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:27 AM2021-07-20T04:27:56+5:302021-07-20T04:27:56+5:30
रिसोड : तालुक्यातील हराळ ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सात घरकुलांचे लाभार्थी राेहयाेच्या पैशांपासून वंचित असून, त्यांनी पैसे देण्याची मागणी ...
रिसोड : तालुक्यातील हराळ ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सात घरकुलांचे लाभार्थी राेहयाेच्या पैशांपासून वंचित असून, त्यांनी पैसे देण्याची मागणी १९ जुलै राेजी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
घरकुल लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात रोजगार सेवक व सचिव यांच्या विरोधात तक्रारीचा पाढाच वाचला आहे. हराळ ग्रामपंचायतचे सचिव बी.आर.आरु व रोजगार सेवक अशोक सरकटे त्यांच्या कर्तव्यात कसुर करत असून, रोजगार हमीचे पैसे मागितले असता, समाधानकारक उत्तर न देता उडवाउडवीचे उत्तर देऊन वरिष्ठ पातळीवर जाण्याची सल्ला देत असल्याचे म्हटले आहे. घरकुल योजने घरकुलाचे काम अंतिम टप्प्यात आले तरीसुद्धा रोजगार हमी योजनेंतर्गत मिळणारी रक्कम अद्यापपर्यंत आम्हाला मिळाली नाही. यासंदर्भात रोजगार सेवक अशोक सरकटे यांना आम्ही केलेल्या कामाचे मष्टर टाकण्यास सांगितले असता हेतुपुरस्सर ते टाळाटाळ करीत आहेत. रोजगार सेवकाच्या सततच्या त्रासामुळे आम्ही सर्व घरकुल लाभार्थी त्रस्त झालो आहोत. आमच्या या महत्त्वपूर्ण अडचणींवर तत्काळ तोडगा काढून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला नाइलाजास्तव पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसावे लागेल, असा इशारा घरकुल लाभार्थी दिलीप सपकाळ, उत्तम सरकटे, शोभा ताकतोडे, मुकिंदा नरवाडे, प्रल्हाद पडघान, भारत धांडे, किसन तुरुकमाने यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे.