कापूस वेचणीसाठी गेलेल्या महिलांवर मधमाशांचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 02:03 PM2019-12-17T14:03:08+5:302019-12-17T14:03:18+5:30
तीन महिला गंभीर जखमी झाल्या; तर अन्य तीन महिलांनाही या घटनेत इजा पोहचली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : तालुक्यातील जऊळका रेल्वे गावानजिक असलेल्या अमानवाडी येथील कापूस वेचणीला गेलेल्या मजूर महिलांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढविला. त्यात तीन महिला गंभीर जखमी झाल्या; तर अन्य तीन महिलांनाही या घटनेत इजा पोहचली.
प्राप्त माहितीनुसार, अमानवाडी येथील मजूर महिला नित्यनेमाप्रमाणे सोमवारी सकाळच्या सुमारास कापूस वेचणीच्या कामाकरिता शेतकरी कुळकर्णी यांच्या शेतात गेल्या होत्या. सकाळी ११ वाजताच्या सुमारास आंब्याच्या झाडावर असलेल्या आग्या मोहोळाने कपाशी वेचणीत गुंतलेल्या महिलांवर अचानक हल्ला चढविला. त्यात सरस्?वतीबाई हरिदास आंबेकर (वय ६० वर्षे), अश्विनी गजानन कुलकर्णी (वय ३० वर्षे) आणि सरलाबाई पांडे (वय ६० वर्षे) या तीन महिला गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्या; तर अन्य तीन महिला मजूरही या घटनेत किरकोळ जखमी झाल्या. गावातील नागरिकांना घटनेची माहिती कळताच अमानवाडी येथील काही युवकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले व जखमी महिलांना उपचाराकरिता वाशिमच्या रुग्णालयात दाखल केले.